‘टाईम फ्री झोन’ नॉर्वेतील सोमोरॉय

    दिनांक :25-Jun-2019
निलेश जठार  
 
नॉर्वेतील निसर्गसुंदर आणि शांत पर्यटनस्थळ असलेल्या सोमोरॉय या बेटाने त्यांना टाईम फ्री झोन म्हणून जाहीर करावे, अशी याचिका दाखल केली असून, अशी मागणी करणारे जगातील ते पहिले बेट बनले आहे. या बेटाची लोकसंख्या 500 च्या जवळपास आहे आणि त्यातील 300 लोकांनी या याचिकेवर सह्या केल्या आहेत. टाईम फ्री झोन म्हणजे घड्याळाचा जाच नसलेला भाग. म्हणजे वेळेचे बंधन नाही आणि घड्याळापासून मुक्ती. यासाठी केजले ओव हेविंग यांनी पुढाकार घेतला आहे.
 
 
 
हेविंग सांगतात, आमच्या येथे 18 मे ते 26 जुलै असे 69 दिवस सूर्य मावळत नाही, तर हिवाळ्यात तीन महिने सूर्य उगवत नाही म्हणजे तीन महिने पूर्ण अंधार असतो. म्हणजे दिवस आणि रात्र याला काही येथे अर्थ नाही. उन्हाळ्यात येथे घड्याळाच्या वेळेनुसार रात्री 2 वाजतासुद्धा मुले फुटबॉल खेळताना, स्वििंमग करताना दिसतील, तर मोठे लोक घरे रंगविताना, साफसफाई करताना, लॉन कापताना दिसतील. त्यामुळे आम्हाला पारंपरिक कामाच्या वेळा पाळण्यापासून मुक्ती हवी आहे.
 
यामुळे रहिवाशांना शाळा, कॉलेज, नोकर्‍यांच्या वेळात लवचीकपणा आणता येईल. येथे पर्यटन आणि मासेमारी हे दोन मुख्य व्यवसाय आहेत. येथील बहुतेक रहिवासी त्यांचा बहुतेक वेळ मासेपालन किंवा मासेमारीमध्ये घालवितात. मग त्यासाठी वेळापत्रकाची गरज काय?
 
सोमोरॉय बेटाच्या या मागणीची जगभर चर्चा सुरू झाली आहे, मात्र स्थानिक खासदार केंट गुडमंडस्मन यांनी या याचिकेचा पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले आहे. शेजारील दोन शहरे फिनमार्क आणि नॉर्डलंड यांनी त्यांना समर्थन दिले आहे. युरोपच्या पर्यटनात प्रवाशांना लवलॉक लावलेले पूल पाहायला मिळतात, तर येथे घड्याळे बांधलेले पूल दिसतात. दीर्घ काळ येथे अंधार असल्याने रहिवाशांना घड्याळाप्रमाणे काम करण्याचा ताण येतो. येथील रहिवाशांनी वेळेच्या जंजाळात फसू नये आणि जीवन मनमुराद जगावे यासाठी ही मोहीम सुरू केली गेली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दिसणारे नॉर्दन लाईट पाहण्यासाठी येथे मोठ्या संखेने पर्यटक येतात त्याचबरोबर येथील निसर्गसौंदर्य, पांढर्‍याशुभ्र वाळूचे किनारे, सिनरी याचे पर्यटकांना मोठे आकर्षण आहे.