गागरोणचा किल्ला

    दिनांक :25-Jun-2019
 
पल्लवी खताळ-जठार 
 
चारी बाजूंनी पाणी आणि पायाशिवाय बांधला गेलेला राजस्थानच्या वाळवंटातील झालावाड जिल्ह्यात असलेला गागरोण हा किल्ला, त्याचा शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास आजही अभिमानाने मिरवितो आहे. अनेक कारणांनी हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकतर तो चारी बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे तसेच राजस्थानच्या इतिहासातील सर्वात मोठा जोहार (राजपूत स्त्रिया, लढाईत पराभव होतोय असे दिसताच स्वतःला चितेत जाळून घेत असत तो प्रकार) येथेच झाला आणि 14 युद्धे या किल्ल्याने झेलली. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात या किल्ल्याची नोंद केली गेली आहे. 

 
 
12 व्या शतकात डोड राजा बीजलदेव याने या किल्ल्याचे बांधकाम सुरू केल्याचे सांगितले जाते. मात्र, हा किल्ला प्रसिद्धीला आला तो राजा अचलशहाच्या काळात. या राजाचा मांडूचे सुल्तान होशंगशहा याने पराभव केला तेव्हा हजारो राजपूत महिलांनी येथे जोहार करून प्राणत्याग केला. मात्र, अचलदासाच्या पराक्रमाने थक्क झालेल्या शहाने किल्ल्याची कोणतीही मोडतोड केली नाही. त्यानंतर या किल्ल्याच्या ताबा शेकडो वर्षे मुस्लिमांकडेच होता.
 
या किल्ल्याबाबत अशी कथा सांगितली जाते की, राजा अचलदास याचा पराभव होऊन तो मृत्युमुखी पडल्यानंतरही त्याच्या किल्ल्यावरील शयनगृहातील पलंग 1950 पर्यंत तसाच ठेवला गेला होता. कारण रोज रात्री या खोलीतून हुक्का ओढल्याचा आवाज येत असे. हा पलंग रोज एक न्हावी व्यवस्थित करून जाई व सकाळी तो जेव्हा पुन्हा पलंग आवरण्यासाठी येत असे तेव्हा त्याला गादीवर 5 रुपयांचे नाणे ठेवलेले मिळत असे. या न्हाव्याने अनेक दिवसांनंतर नाणे मिळत असल्याची गोष्ट बाहेर सांगितली आणि तेव्हापासून नाणे मिळणे बंद झाले, असेही सांगतात.
 
या किल्ल्याला दोन प्रवेशद्वारे आहेत. तसेच गणेश पोल, भैरवी पोल, किशन पोल असे अनेक दरवाजे आहेत. किल्ल्यात दिवान-ए-आम व खास, जनानखाना, मधुसूदन मंदिर, रंगमहाल अशा इमारती आहेत.
 
या भागाचे सर्वात मोठे आकर्षण आहे ते येथील पोपट. नेहमीच्या पोपटापेक्ष दुप्पट आकाराचे हे पोपट बोलके राघू आहेत. म्हणजे माणसाच्या आवाजाची ते हुबेहूब नक्कल करतात. गर्द हिरव्या रंगाचे हे पोपट पंखांवर लाल निशाण असलेले व गळ्यावर काळा व लाल रंगाचा पट्टा असलेले आहेत. या ठिकाणी अनेक पर्यटक वर्षभर भेट देण्यासाठी येत असतात.