डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या मृत्यूचे रहस्य!

    दिनांक :25-Jun-2019
तिसरा डोळा  
 
 चारुदत्त कहू 
 
स्पर्धात्मक जगात एखाद्या व्यक्तीची प्रगतीची रेष ओलांडून तिला माघारी टाकणे अपेक्षित असते. त्यासाठी कठोर मेहनत लागते, तरच पुढचा माघारतो. पण, ज्या वेळी असे शक्य होत नाही, त्या वेळी आपली प्रगतीची रेष मोठी करण्याऐवजी समोरच्या व्यक्तीचा काटा काढणे सोयीचे समजून, तिची हत्या केली जाते किंवा तिला या जगातून संपविले जाते. राजकीय बंड करून विरोधकांचा सामूहिक सफाया करण्याचे प्रकार काही नवे नाहीत. नेपाळमध्ये तर सत्तासंघर्षात मोठा राजकीय कट करून राजघराण्यातील 17-18 लोकांचे सामूहिक हत्याकांड करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर अगदी स्थानिक पातळीवरही अशा घटना अपवादाने का होईना पण बघायला मिळतात. कुठे केरळमध्ये डाव्यांचा कन्नूर पॅटर्न वापरून राजकीय विरोधकांना संपविले जाते, तर कुठे नक्षल्यांकरवी विरोधकांचा नायनाट केला जातो. बंगालमधील घटना तर ताज्या आहेत. राजकीय संघर्षातून विरोधकांचा काटा काढण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसतर्फे तेथे थेट हिंसाचाराचा  मार्ग अवलंबिला जात असून, यात गेल्या काही दिवसांत शंभरावर लोकांचा बळी गेलेला आहे. असाच हिंसाचाराचा मार्ग डाव्यांनी वर्षानुवर्षे बंगालमध्ये अवलंबला. जोरजबरदस्तीने तीन दशके सत्ताशकट हाकले.
 
 
 
डाव्यांची दंडेली मोडून काढत सत्तेवर आलेल्या तृणमूलनेही सत्तेसाठी राजकीय हिंसाचाराचा मार्ग अवलंबून ‘हम किसी से कम नही’ हे जगाला दाखवून दिले आहे. जनसंघाचे नेते दीनदयाल उपाध्याय यांचे शव मुगलसराय रेल्वेस्थानकाच्या रुळावर आढळले होते. त्यांची हत्या कुणी केली, हे अद्याप कळलेले नाही. पण, त्यामागे राजकीय कटकारस्थान असल्याचे कुणी नाकारलेलेही नाही. लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यूही असाच अज्ञात विमान अपघातात ताश्कंदला झाला. त्यांच्या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील अनेक शास्त्रज्ञांचे गेल्या काही वर्षांत झालेले गूढ मृत्यू राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी झालेले नसले, तरी ते वैज्ञानिक आणि अंतराळातील स्पर्धेपोटी झाले नसतील असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरावे.
असाच एक गूढ मृत्यूचा मुद्दा, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्‌डा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. 23 जून 1953 रोजी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा गूढ मृत्यू झाला होता. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रविवारी भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्‌डा यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना जे. पी. नड्‌डा यांनी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी केली जायला हवी होती, असे मतप्रदर्शन केले. कारण त्यांच्या मृत्यूनंतर लोकांचीच तशी मागणी होती. इतिहासाची त्याला साक्ष आहे. पण, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी अखेरपर्यंत होऊ दिली नाही, अशी खंत व्यक्त करून, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा निर्धारही नड्‌डा यांनी व्यक्त केला.
जम्मू-काश्मीरला भारताचे पूर्ण आणि अभिन्न अंग बनविण्याचा श्यामाप्रसाद मुखर्जींचा निर्धार होता. ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे,’ असा त्यांचा नाराच होता. त्या वेळी जम्मू-काश्मीरचा निराळा झेंडा होता, निराळे संविधान होते (जे आजही अस्तित्वात आहे) आणि तेथील मुख्यमंत्र्याला (वजीर-ए-आज़म) अर्थात पंतप्रधान म्हटले जायचे. राष्ट्रपतींच्या अध्यादेशाद्वारे या राज्याला मिळालेला विशेष दर्जा रद्द व्हावा म्हणून संसदेतील आपल्या भाषणात त्यांनी जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा देणारे घटनेतील कलम 370 रद्द करण्याची मागणी केली होती. ऑगस्ट 1952 मध्ये जम्मूमध्ये झालेल्या एका विशाल सभेत त्यांनी, ‘‘मी तुम्हाला भारतीय संविधात प्राप्त करून देईल अथवा उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती देईल,’’ असा संकल्पच केला होता. यासाठी त्यांनी तत्कालीन नेहरू सरकारला आव्हान दिले आणि आपल्या संकल्पावर ते अखेरपर्यंत अटल राहिले. संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1953 मध्ये कुणाचीही परवानगी न घेता (परमिट राजविरोधात) जम्मू आणि काश्मीरची यात्रा प्रारंभ केली. तेथे पोहोचताच त्यांना राज्य सरकारने अटक केली आणि नजरकैदेत ठेवले. 23 जून 1953 रोजी त्यांचा गूढ मृत्यू झाला. ही राजकीय हत्याच होती. आपल्या विरोधकांचा सफाया करण्यासाठी त्यांच्यापेक्षा मोठे काम करून आपली कर्तृत्वाची रेष मोठी करण्याऐवजी, तत्कालीन केंद्र सरकारने राज्य सरकारच्या संगनमताने डॉ. मुखर्जी यांचा काटा काढला होता.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत अनेक वर्षे सहयोगी म्हणून काम केले. एका श्रद्धांजली सभेत त्यांनीदेखील, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या हत्येचा कट तत्कालीन केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारने रचल्याचा आरोप लावला होता. या राज्यातील परमिटराज संपण्यासाठी आणि हे राज्य भारताचे अभिन्न अंग असल्याचे आपण बघतो आहोत, त्याचे सारे श्रेय मुखर्जींना द्यायला हवे, असे ते म्हणाले होते. खरेतर मुखर्जींनी जेव्हा परमिटराजविरोधात आंदोलन छेडले, तेव्हा त्यांना पंजाबमध्येच अटक व्हायला हवी होती. पण, तसे न करता राज्य आणि केंद्राच्या योजनेनुसार त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये सहज प्रवेश करू दिला गेला आणि योजनेनुसार त्यांना तेथून परत न पाठवण्याची व्यवस्था केली गेली. त्यांना अटक करून श्रीनगरला आणण्यात आले. ज्या वेळी अटक झाली त्या वेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची प्रकृती अतिशय तंदुरुस्त होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या वार्तेने देशभरात खळबळ उडणे स्वाभाविक होते. देशभरातील जनतेने याबाबत स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी केली. दस्तुरखुद्द मुखर्जींच्या मातोश्री जोगमाया देवी यांनी निष्पक्ष यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तथापि, देशातील जनतेची आणि जोगमाया देवींची मागणी नेहरूंनी फेटाळून लावली. ‘‘या दुर्घटनेशी संबंधित सर्वांशी चर्चा केल्यानंतर, त्या हत्येमागे काहीही गूढ नसल्याची माझी खात्री पटल्याचे’’ कारण देत, त्यांनी ही चौकशी नाकारली. यानंतर त्यांनी या गूढ हत्येची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणार्‍या जोगमाया देवींच्या पत्राकडेही दुर्लक्ष केले. तेव्हापासून डॉ. मुखर्जी यांच्या हत्येमागील नेहरू-शेख अब्दुल्ला यांच्या कट-कारस्थानाबद्दल सर्वत्र बोलले जाते, पण त्यावर शिक्कामोर्तब करणारी यंत्रणा आजवर अस्तित्वात आली नाही. आज देशात भारतीय जनता पार्टीचे आणि जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट असल्याने तेथेही केंद्रीय शासन अस्तित्वात आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने या प्रकरणाची फाईल उघडून हे प्रकरण तडीस नेण्याची शक्यता पडताळून बघायला हवी.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी एक कुशल राजकारणी होते. बी.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते विदेशात गेले. इंग्लंडमध्ये बॅरिस्टर उपाधी घेऊन ते भारतात परतले. वयाच्या केवळ 33 व्या वर्षी त्यांची कोलकाता विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली. यामुळे ते सर्वात कमी वयाचे कुलगुरू ठरले! त्यांनी तहहयात नेहरू आणि गांधींच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा विरोध केला. त्यांच्या रूपात देशाने एक शिक्षणतज्ज्ञ, अनुभवी राजकारणी आणि एक राष्ट्रप्रहरी गमावला आहे. त्यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडल्यास देशभक्तांंचे शोषण करणारी अनेक कटकारस्थाने उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही! पप
9922946774