आत्महत्या करणाऱ्या मायलेकी सिदी मेघेच्या

    दिनांक :25-Jun-2019
नागपूर,
येथील गांधीसागर तलावात उडी मारून आत्महत्या करणाऱ्या मायलेकीची ओळख पटली असून त्या वर्धा जिल्ह्यातील सिदी मेघे या गावी राहणाऱ्या आहेत. साहिली नितीन खावळे (२२) आणि माहेश्वरी नितीन खावळे (१० महिने) दोन्ही रा. धांडे ले आऊट, सिदी मेघे (जि. वर्धा) अशी या मायलेकींची नावे आहेत. 

 
 
दोन वर्षांपूर्वी साहिलीने नितीनसोबत प्रेमविवाह केला होता. नितीन हा वाहनचालक होता. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर त्याच्यांत कौटुंबिक कारणावरून वाद होऊ लागला. दहा महिन्यांपूर्वी त्यांना मुलगी झाली. त्या वादात आणखी भर पडली. कौंटुंबिक कलहामुळे साहिली त्रस्त झाली होती आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
 
२० जून रोजी घरी कुणालाही काही न सांगता ती मुलीसह बेपत्ता झाली. दोन दिवस वाट पाहूनही ती न आल्याने शेवटी सावंगी मेघे पोलिस ठाण्यात ती हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली. सिदी मेघे पोलिस तिचा शोध घेत असतानाच सोमवारी सकाळी १० च्या सुमारास गांधीसागरात दोघींचेही मृतदेह तरंगताना दिसले. काठावर फक्त साहिलीच्या चपला होत्या. ओळख पटण्याजोगे त्यांच्याजवळ काहीच नव्हते. त्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दोघाही मायलेकींची छायाचित्रे पाठविली. छायाचित्रे पाहून सोमवारी सायंकाळी सिदी मेघे पोलिस ठाण्यातून एका शिपायाचा गणेशपेठ पोलिसांना फोन आला.
 
व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणारी महिला व तिची मुलगी या सावंगी मेघे येथील असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर साहिलीचा पती नितीन, सासू उषा आणि तिचे आईवडिल वर्धा पोलिसांसोबत काल रात्रीच नागपूरला आले. परंतु, शवागार बंद असल्याने मंगळवारी सकाळी दोघींचेही मृतदेह त्यांना दाखविले असता साहिलीच्या नातेवाईकांनी त्यांची ओळख पटविली. शवविच्छेदन झाल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून साहिलीने हे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले आहे.