तलावात मासेमारी करणार्‍यांना मोठा दिलासा

    दिनांक :26-Jun-2019
 
- संचयनाच्या रक्कमेत 90 टक्के सूट
मोर्शी,
राज्यातील मासेमारांना तलावात मत्स्यबीज संचयनच्या अगाऊ रकमेत 90% सूट मिळणार आहे. या निर्णयामुळे हजारो मासेमार सहकारी संस्थांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र छोटे-मोठे मिळून सुमारे 2 हजार 579 तलाव आहेत. त्या सुमारे 3 लाख 52 हजार 615 हेक्टर जलक्षेत्र व्यापले आहे. यावर महाराष्ट्रातील सुमारे 20 लाख मासेमार बंधू मासेमारीचा व्यवसाय करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जलाशय व तलाव विनामूल्य देण्याची घोषणा केली होती. त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला होता.
 
 
 
त्या शासन निर्णयात तलावाच्या ठेक्याची रक्कम भरताना मत्स्यबीज संचयनाबाबत जाचक अटी मत्स्यव्यवसाय विभागाने नमुद केल्या होत्या. या जाचक अटीच्या विरोधात सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रकोष्ठ प्रमुख तथा मुंबई मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे तसेच महाराष्ट्र सहकार भारतीचे मासेमार सहकारी संस्था प्रकोष्ठ वासुदेव सुरजुसे तसेच पुणे मच्छीमार संघर्ष कृती समितीचे किरण गीते व अकोला मच्छीमार संघाचे अध्यक्ष दशरथ केवट, अमरावती जिल्हा मच्छीमार संघाचे माजी-उपाध्यक्ष संभाजी कावनपुरे, अ‍ॅड. शंकर वानखडे, दादाराव आळणे, सुखदेव मेश्राम व अलका घाटे यांनी हा प्रश्न मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री जानकर यांचे खाजगी सचिव भागवत मुरकुटे, मत्स्य आयुक्त अरुण विधळे यांच्याकडे रेटून धरला होता.
 
22 फेब्रुवारी 2019 शासन परिपत्रकातील जाचक अट रद्द करण्यात यावी अशी मागणी मच्छीमार नेत्यांनी केली होती. मत्स्य व्यवसाय विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही मागणी मान्य केली असून केवळ दहा टक्के रक्कम मासेमारी संस्थेतर्फे घेण्यात यावी, असा आदेश 25 जून रोजी काढण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय विभागातर्फे नवीन शासन निर्णय काढण्यास विलंब होत असून त्यामुळे राज्यातील सर्व तलाव ठेक्याच्या प्रक्रियेला पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र राज्यातील सर्व मत्स्यव्यवसाय कार्यालयांना सहआयुक्त मत्स्यव्यवसाय व्ही. व्ही. नाईक यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आले आहे. ही स्थगिती केवळ दहा ते पंधरा दिवसांसाठी असेल, अशी माहिती मुंबई मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश लोणारे यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील मासेमार संस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.