अमरावतीत ५५ लाखांचा तब्बल १० टन गांजा जप्त

    दिनांक :26-Jun-2019
अमरावती,
आंध्र प्रदेशातून नागपूर-अमरावती मार्गे वाराणशीला जात असलेला 55 लाखांचा 10 टन गांजा अमरावती ग्रामीण पोलिस गुन्हे शाखा व लोणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी दुपारी जप्त केला. विशेष म्हणजे ही कारवाई आज राज्यभरात साजर्‍या होत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी दिनी करण्यात आली. त्यामुळे या कारवाईला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. 
 
 
समाधान शंकर हिरे रा.जळगाव असे अटक करण्यात आलेल्या एकमेव आरोपीचे नाव आहे. चालक व अन्य एक आरोपी पसार झाल्याची माहिती आहे. आंध्र प्रदेशातून नागपूर-अमरावती मार्गे वाराणसीला ट्रकमधून गांजा जात असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर या संयुक्त पथकाने लोणी मार्गावर नाकाबंदी केली. प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू असताना एचआर 46/1657 क्रमांकाच्या ट्रकवर पोलिसांना संशय आला. या ट्रकची तपासणी सुरू करण्यात आली. या ट्रकमध्ये पाहताक्षणी केळी असल्याचे दिसत होते. मात्र पोलिसांनी पूर्ण तपासणी केल्यावर ट्रकमध्ये गांजा भरलेले 35 पोते आढळून आले. हा 10 टन गांजा असून त्याची किंमत 55 लक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
ट्रकचा चालक समाधान हिरे याची पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने संपूर्ण माहिती त्यांना सांगितली. ट्रकमध्ये सापडलेला गांजा व ट्रक जप्त करण्यात आला आहे. त्या ट्रकची किंमत 17 लाख आहे. म्हणजेच पोलिसांनी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.