इंग्लंडला पछाडून भारतीय संघ क्रमवारीत टॉपवर

    दिनांक :26-Jun-2019
लंडन,
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंड संघाला अव्वल स्थान गमवावे लागले असून भारतीय संघ पुन्हा अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. ताज्या क्रमवारीनुसार, भारतीय संघ पहिल्या स्थानावर असून इंग्लंड दुसऱ्या स्थानी आला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ 123 गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर इंग्लंडला दोन गुणांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यांच्या खात्यात 122 गुण आहेत. मे 2018 पासून इंग्लंड अव्वल स्थानावर होता. 
 
 
यजमान इंग्लंड संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. सात सामन्यानंतर त्यांच्या खात्यात 8 गुण जमा आहेत आणि उर्वरित दोन सामन्यात त्यांना भारत व न्यूझीलंड या तगड्या प्रतिस्पर्धींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश हा अनिश्चित मानला जात आहे. दुसरीकडे भारतीय संघ पाच सामन्यांत ( 4 विजय व 1 अनिर्णीत) 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
 
 
 
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पटकावला. न्यूझीलंड आणि भारत उंबरठ्यावरच आहेत, परंतु चौथ्या स्थानासाठी आता इंग्लंडसह आणखी तीन संघ स्पर्धेत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा पराभव बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना आशेचा किरण दाखवणारा ठरला आहे.