आलियाचं युट्यूब चॅनेल प्रदर्शित

    दिनांक :26-Jun-2019
बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि तितकीच क्युट अभिनेत्री आलिया भट्टने तिचं नवीन युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. अभिनय क्षेत्रामध्ये नशीब आजमावल्यानंतर तिने नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या नव्या युट्यूब चॅनेलची माहिती चाहत्यांना दिली आहे.
 
  
आलियाने तिचं नवीन युट्यूब चॅनेल लॉन्च केल्यानंतर तिचा पहिला व्हिडीओही शेअर केला आहे. ‘काही नवं, काही मजेदार, YouTube’वर असं कॅप्शन आलियाने या व्हिडीओला दिलं आहे. या नव्या चॅनलच्या माध्यमातून आलिया तिच्या चाहत्यांना तिचं शेड्युल, मेकअप, फॅशन व फिटनेस टीप्स देणार आहे.
आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती प्रचंड आनंदात दिसून येत आहे. विशेष म्हणजे आलियाने हे चॅनेल सुरु केल्यानंतर केवळ एका तासामध्ये त्याला ३२ हजार लोकांनी सब्सक्राइब केलं आहे. आलिया चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम प्रयत्न करत असते. इन्स्टाग्राम, ट्विटवरदेखील तिचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. इन्स्टावर तिचे ३४.२ मिलिअन फॉलोअर्स असून ट्विटरवर १९.७ मिलिअन फॉलोअर्स आहेत.
दरम्यान, आलिया लवकरच अयान मुखर्जी यांच्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं वाराणसीमधील चित्रीकरण पूर्ण झालं असून सध्या दोघंही मुंबईमध्ये परतले आहेत.