मातृभाषेसाठी माय अन्‌ बापही काय करताहेत?

    दिनांक :26-Jun-2019
यथार्थ  
श्याम पेठकर
 
परवा मुंबईला गेलो होतो. आता यात सांगण्यासारखे काही नाही. कारण पंधराच दिवसांपूर्वी एक मित्र भेटला. आठवडाभर तो दिसला नव्हता. विचारले, ‘‘कुठे गायब होतास?’’ तर म्हणाला, ‘‘इंडिया-पाकिस्तानची मॅच बघायला इंग्लंडला जाऊन आलो. काय आहे, माझ्या चुलतभावाचा मुलगा तिकडे आहे, सारखा म्हणत होता, काका ये ना माझ्याकडे. यावेळी चान्स होता तर जाऊन आलो.’’ सहज गावाकडे फेरफटका मारावा तसा तो इंग्लंडला जाऊन आल्याचे सांगत होता... तर सांगायचे हेच की, मी मुंबईला जाऊन आलो, यात इतके काही भारी नाही. बरे, तिथला तो किस्सा मी सांगणार आहे तो महाराष्ट्रात कुठेही घडू शकतो. किस्सा लिफ्टमधला आहे; पण तो घडण्यासाठी लिफ्ट हेच लोकेशन हवे, असेही काहीच नाही... तर तिथे एका मित्राला भेटायला गेल्यावर लिफ्टमध्ये एक मराठी माय आणि मावशी माझ्यासह उद्वाहनगामिनी (म्हणजे लिफ्टसोबती) होत्या. 

 
 
त्या मराठी असल्याच्या काही खुणा होत्या. वेश आधुनिक होता तरीही त्या पायात चाळ, जोडवे घातलेल्या होत्या. कडेवर लेकरू होते. नुकतेच बोलू लागलेले होते. त्याच्याशी त्या धडल्लेसे इंग्रजीत बोलत होत्या. तो मुलगा... (की मुलगी?) जाऊ द्या, सोप्पं करू, बेबी म्हणू आपल्या भाषेत. तर बेबीवर सराउंडिंगचा परिणाम झाला असेल. अगदीच मॉंस्ट्रेसली मिडलक्लाससारखे वागत होते ते बाळ. (बघा बेबीला शब्द सापडला मराठीत) म्हणजे त्याच्यावर सराउंडिंगचा परिणाम झाला असावा नुकत्याच बोलू लागलेल्या वयातही. ते बाळ चक्क मराठीत बोलू बघत होतं. त्याला, नक्कीच आपली मुलं इंग्रजी शाळेत घालून अन्‌ घरातही इंग्रजी वर्तमानपत्रच आलं पाहिजे, हा कटाक्ष पाळणार्‍या अन्‌ मराठीच्या अवनतीबद्दल अपार कळवळा दाटून आलेला मराठीचा प्राध्यापककिंवा मराठीच्या दुधाची साय खाण्याचा अभिमान बाळगणार्‍या मराठी अभिमानी माणसाचा त्याला सहवास लाभला असावा.
 
त्यामुळे ते बाळ मराठीत बोलू पाहात होतं आणि त्याची आई (सॉरी मॉम) त्याने मराठी बोलल्यावर आपला घोर अपमानच करतो आहे तो, अशी त्याच्याकडे रागावून बघत होती. मला त्या लेकराचे कौतुक वाटले आणि माझ्या डोळ्यांतून ते त्याला दिसले असावे. लहान मुलं आणि स्त्रियांना स्पर्श आणि नजरेची भाषा कळते. त्यामुळे त्याला माझे कौतुक पोहोचले असावे, त्यामुळे तो अधिकच मराठी बोलू बघत होता. अखेर त्याच्या मातेने मातृभाषेत बोलू पाहणार्‍या आपल्या मुलाचा इतक्या जोरात गालगुच्चा घेतला (खरेतर गालाचा चिमटा घेतला, असेच म्हणावे.), की ते पोर रडू लागले. ते रडणे इंग्रजीत, हिब्रूत, की मराठीत ते काही कळले नाही. अश्रूंची कुठली भाषा असते, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
शाळा सुरू होण्याच्या या दिवसांत मराठीचा कळवळा दाटून आलेला असतो. मराठी शाळा बंद पडत असल्याची सार्वत्रिक खंतही व्यक्त होत असते. त्यातच आता मराठी मुलुखात निवडणुका होऊ घातल्या आहेत. मराठीचा अथक स्वाभिमान बाळगणारी शिवसेना सरकारात आहे अन्‌ त्यांनी मराठी सोडून बरीच वर्षे झाली आहेत. सकाळी मराठीत असलेला ‘सामना’ बरीच वर्षे झालीत दुपारी ‘दोपहरका’देखील झाला आहे. मराठीचा लढा लढणार्‍या ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणणार्‍या छोट्या राजेंची सध्या वाचा गेली आहे. त्यामुळे त्यांना आता कुठल्या भाषेत बोलावे, हा प्रश्न पडला आहे.
 
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अशी मागणी केवळ साहित्य संस्थांनीच करायची असते. तरीही मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच प्रकारच्या बोर्डांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा केला आहे. आता नेमके त्याचे काय होईल, ते लवकरच कळेल. कारण, तमाम मराठी माय-बाप जे आपल्या मुलांना प्रचंड खर्च करून पंचतारांकित इंग्रजी शाळांमध्ये घालतात ते काय मराठी शिकायला नव्हे! आपल्या अपत्याच्या शाळेत मराठी बोलले तरी शिक्षा करतात, असे हेच माय-बाप कौतुकाने सांगतात. आम्हीदेखील त्याच्याशी घरी इंग्रजीतच बोलतो, असेही सांगतात. म्हणजे मुलावर योग्य ते(!) भाषिक संस्कार व्हावेत यासाठी ते एकमेकांशी कम्युनिकेशनदेखील इंग्रजीत करतात. ज्यांच्या घरी इंग्रजी न बोलू शकणारे आजी, आजोबा असतील (म्हणजे ग्रॅण्ड मा आणि ग्रॅण्ड पा नसतील) त्यांना अडगळीत टाकले जाते.
 
उगाच मुलगा त्यांच्यामुळे मराठी बोलू- वाचू लागेल. ते चुकून त्याला ‘श्यामची आई’ वाचायला देतील, म्हणून असे आजी, आजोबा घरात नकोतच, याची काळजी मराठी घरांत घेतली जाते. ही मुलं त्यांच्या शाळेत आपली आडनावं सांगत नाहीत अन्‌ टीचरनेही ती उच्चारू नयेत, असे त्यांना वाटते. म्हणजे अनिकेत कुळकर्णी असेल तर त्याला टीचरने अनिकेतच म्हणावे, कारण कुळकर्णी म्हटले की त्याचे मराठीपण नाकातून अचानक बाहेर पडलेल्या शेंबडासारखे लाजिरवाणे समोर येते, असे त्याला वाटते. आपली आडनावं बजाज, वर्मा, शर्मा, घोष, नायडू अशी का नाहीत, असं विचारतात. फर्नांडिस, डिसुझा असेल तर फारच उत्तम वाटते. त्यामुळे ते त्यांच्या नावाचे अपभ्रंशही अनिकेतचे ॲनी असे करतात. फार फार वर्षांपूर्वी अनिकेतचे अन्या व्हायचे. त्या वेळी अनिकेतसारखी लोणकढी नावेही नसायची. प्रकाश, दीपक, हरी, शंकर वगैरे असायची. नावे बदलली तरीही ती अभिजात मराठी आहेत, हेही नसे थोडके!
 
आता मराठीचे जतन, संवर्धनवगैरे करण्याची जबाबदारी सरकारचीच असते. मराठी शाळा बंद पडत आहेत, त्याचीही सगळीच जबाबदारी सरकारचीच असते. सरकार अजीबात लक्ष देत नाही. बेजबाबदार आहे. सरकारी काम केवळ आणि केवळ मराठीत व्हायला हवे. मराठी शाळांना अनुदान सरकारनेच दिले तरच त्या टिकतील. मराठी भाषा टिकली पाहिजे, ही जबाबदारी सरकारचीच आहे. मराठी शाळा का बंद होत आहेत? शाळा काय केवळ अनुदानावरच चालतात का? त्या चालविण्याची जबाबदारी सरकारची आहे का? शिक्षक असले, इमारत असली, देखभाल आणि वेतन यांचा रतीब सुरू राहिला की मराठी शाळा टिकतील का? आम्ही आमची मुले मात्र इंग्रजी शाळांमध्येच घालणार आहोत.
 
कधीकाळी देशात प्राथमिक पूर्व म्हणजे बालवाडीचे शिक्षण असायचे, आता केजी वन आणि टू सुरू झाल्यालाही दोनेक पिढ्या नक्कीच झाल्यात. म्हणजे मराठी शाळेकडे पाठ फिरविलेली तिसरी पिढी आता नांदते आहे. मुलांना इंग्रजीतच बोलता आणि लिहिता यायला हवे, असा आमचा अट्‌टहास असतो. मराठी अनुदानित शाळांतील मास्तरलोकांना विद्यार्थी-शोधमोहिमेवर उन्हाळ्याच्या सुट्‌ट्यांतच निघावे लागते. शाळा व्यवस्थापनाकडून त्यांना तसे लक्ष्य निर्धारित करून दिले जाते. शिक्षकांना आपली नोकरी टिकवायची असेल अन्‌ स्थानांतरण नको असेल, तर त्यांनी अमुक एक संख्येत विद्यार्थी आणायलाच हवेत. आजकाल आम्हाला सेमी इंग्रजीदेखील नाही चालत. देशी असे आम्हाला काहीच चालत नाही. परवाच एक बायको तिच्या नवर्‍याला म्हणताना ऐकू आले, ‘‘प्यायचीच असेल तर प्या, पण इंग्रजी प्या. देशी आरोग्याला घातक असते.’’
 
आमच्या घरात मराठी वर्तमानपत्रे आणि पुस्तकांनाही स्थान नाही. इंग्रजी शाळेत शिकलेल्या पालकांचीच आजची पिढी आहे. त्यांनाच नीट मराठी बोलता येत नाही. मराठी घरात जी काय मराठी बोलली जाते तीही निखालस मराठी नाही. तिचा पुरता बोजवारा वाजविला आहे. अनेक शब्द, संज्ञा, वाक्‌प्रचारदेखील मराठी नाहीत. शब्दोच्चारणही आमचे आता मराठी राहिलेले नाही. आम्ही अनेकदा नेमक्या मराठी शब्दांसाठी अडतो. अभिजनांचे असू द्या, त्यांच्या घरात तर अपत्य जन्माला आले की ते अमेरिकेत कसे जाईल, याचाच विचार सुरू झालेला असतो!
 
बहुजनांनी मराठी भाषा टिकवून ठेवली होती. गेल्या काही वर्षांतले बिनीचे मराठी लेखक हे बहुजनांतलेच आहेत. आता मात्र त्याही माता आपल्या लेकरांशी इंग्रजीत बोलत असतात. शाळेत जाण्याच्या आधी लेकराची तयारी करून घेणार्‍या माता त्याला रंगांची ओळख करून देतात, तीही इंग्रजीतच असते. त्याने चुकून ‘लाल’ म्हटले तर आईच सांगते, ‘रेड’ बोलो... हा मराठीत बोलतो आणि मग मराठीत विचार करतो, म्हणून त्याच्या भवितव्याविषयी चिंता निर्माण होऊन ती बापाकडे त्याची तक्रार करते आणि बापही ती गांभीर्याने घेतो... मातृभाषा जर मायच टिकवून ठेवणार नसेल अन्‌ मायचीच भाषा मराठी राहात नसेल, तर मराठीचे काय होणार?