धान पिकावरील तुडतुडे निरीक्षण व व्यवस्थापन

    दिनांक :26-Jun-2019
•डॉ. उषा डोंगरवार
 
भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात धानाचे पीक महत्त्वाचे असून सध्या फुलोरावस्थेत आहे. सद्य:स्थिती बघता धान पिकावर हिरवे, तपकिरी तसेच पांढर्‍या पाठीच्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाचा अनियमितपणा, वाढते तापमान व कोरडे हवामान तुडतुड्यांच्या वाढीस पोषक आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तुडतुड्यांचा प्रामुख्याने धान पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे शेतकर्‍यांची धान पिकाचे निरीक्षण करून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मागील वर्षी खरीप हंगाम 2017 मध्ये धान पिकावर तुडतुडा किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. परिणामी धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले व उत्पादनात घट दिसून आली. 
 
 
धान पिकावरील तुडतुड्यांची ओळख व व्यवस्थापन पुढीलप्रमाणे आहे.
हिरवे तुडतुडे :  तुडतुड्यांचे प्रौढ आणि पिल्ले पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात व रोपांची वाढ खुंटते. हिरव्या तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे भात पिकावर धातुक लसीमुळे टुंग्रो या विषाणुजन्य रोगाचा प्रसार होतो. या किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दिसून येतो.
 
आर्थिक नुकसानीची पातळी :
* 2 तुडतुडे प्रती चूड (टुंग्रो रोगाचा नियमित प्रादुर्भाव होणार्‍या क्षेत्रासाठी)
* 10 तुडतुडे प्रती चूड रोवणीनंतर
* 20 तुडतुडे प्रती चूड फुटवे ते दुधाळ अवस्थेपर्यंत
 
तपकिरी तुडतुडे : पिले व प्रौढ तुडतुडे झाडाच्या बुंध्यामधून व खोडामधून सतत रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाड निस्तेज होऊन सुकून वाळते. तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव शेताच्या मध्य भागातून गोलाकार खळ्याप्रमाणे सुरू होऊन शेत जळल्यासारखे दिसते. यालाच ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात. या किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबरचा दुसरा आठवडा ते ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यामध्ये दिसून येतो.
 
आर्थिक नुकसानीची पातळी : 1. फुुटव्याच्या वेळी 10 तुडतुडे प्रती चूड 2. लोंबीच्या पुढील अवस्थेत 5-10 तुडतुडे प्रती चूड
 
पांढर्‍या पाठीचे तुडतुडे : तपकिरी तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाबरोबरच पांढर्‍या पाठीच्या तुडतुड्यांचासुद्धा प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास चुडाच्या बाहेरील पाने करपलेली आढळतात.
 
तुडतुड्यांचे एकिकृत व्यवस्थापन :
1. नत्र खतांचा संतुलित वापर करावा.
2. पिकामध्ये मित्रकिडींची संख्या वाढविण्यासाठी धान बांधावर झेंडू, चवळी इत्यादी पिकांची लागवड करावी.
3. मेटारायझीयम ॲनिसोप्ली हे जैविक कीटकनाशक 2.5 किलो या प्रमाणात घ्यावे. तसेच बांधीतील पाणी काढून टाकावे.
4. किडींचे सतत निरीक्षण करून आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच शिफारशीत असलेल्या कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. अझाडीरेक्टीन 0.15 टक्के (1500 पीपीएम) 30 मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 एस.एल. 2 मि.ली. किंवा फिप्रोनिल 5 एस.सी. 20 मि.ली. किंवा फ्लोनीकॅमीड 50 डब्ल्यू.जी. 3 ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन 25 एस.सी. 20 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कृषी विज्ञान केंद्र, साकोली, जि. भंडारा