वाशीम कृ.उ.बा.स. चे प्रशासकीय मंडळ बरखास्त

    दिनांक :26-Jun-2019
 
- सचिवावर निलंबनाची कारवाई
वाशीम,
वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणी वारंवार प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन प्रशासकीय मंडळ बरखास्त करुन सचिवावर निलंबनाची कार्यवाही करण्याच्या सूचना सहकार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज, 26 जून रोजी पावसाळी अधिवेशनात उपस्थित तारांकीत प्रश्‍नाला उत्तर देतांना दिल्या.
 

 
 
कृ.उ.बा.स. चे तत्कालीन संचालक दामुअण्णा गोटे व इतर काही तत्कालीन संचालकांनी वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय नेमणुकीपासून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, याप्रकरणाची चौकशी करुन संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली होती. सद्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुनिल केदार, अजित पवार, डॉ. सुनिल देशमुख यांनी वेगवेगळे तारांकीत प्रश्‍न मांडले. त्यामध्ये त्यांनी बाजार समितीतील गैरप्रकाराची चौकशी करुन संचालक मंडळ बरखास्त करण्याचा प्रश्‍न लावून धरला.
 
यावर उत्तर देतांना सहकार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगीतले की, वाशीम कृउबास अंतर्गत प्रशासकीय मंडळाची यासंदर्भातील भूमिका अतिशय संशयास्पद असून, हे प्रकरण न्यायालयामध्ये गेले आहे, परंतु त्यामध्ये कुठलाही स्टे नाही. त्यामुळे प्रशासकीय मंडळ बरखास्त करण्यात येईल तसेच सचिवावर देखील तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकरणाची सहनिबंधक, अमरावती यांचेमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील. तसेच हे प्रकरण जेथून सुरू झाले, ज्यांनी तक्रारी केल्या त्याबाबत देखील नियम 57 अन्वये जबाबदारी निश्‍चित करुन केलेल्या गैरव्यवहाराची संबधितांकडून वसुली करण्यात येईल तसेच चौकशी अंती दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नमूद आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.