ना करवाढ, ना नवीन प्रकल्प, असा आहे नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प

    दिनांक :26-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम  
नागपूर,
महानगरपालिकेचा २०१९-२० सालचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी बुधवारी मनपाच्या महालातील श्रीमंत राजे रघुजी भोसले टाऊन हॉलमध्ये झालेल्या विशेष सभेत सादर केला. ३१९७.६० कोटींच्या या अंदाजपत्रकात कुठलीही करवाढ करण्यात आलेली नाही. तसेच अर्थसंकल्पात कोणत्याही नवीन प्रकल्पाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे बजेट वास्तववादी असल्याचा दावा प्रदीप पोहाणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

 
 
तब्बल ३५ पानाचा अर्थसंकल्प सभागृहात वाचताना प्रदीप पोहोणे यांची चांगलीच दमछाक झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाबमधील अमृतसर येथे घडलेल्या जालियन वाला बाग हत्याकांड घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महानगरपालिकेतर्फे शहीदांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पोहाणे यांनी शहिदांच्या कुटुंबियांविषयी ऋतज्ञ भाव व्यक्त केले. २०१९-२० या आर्थिक वर्षाचे उत्पन्न २७९७.७३ कोटी अपेक्षित आहे. म्हणजेच मूळ बजेट २७९७.७३ कोटींचे आहे. परंतु, सुरवातीची शिल्लक रक्कम ३९९.८७ कोटी रुपये बजेटमध्ये अंतर्भूत करून बजेट ३१९७.६० कोटींवर पोहोचले आहे.
 
या आर्थिक वर्षात ३१९७.३४ कोटींचा खर्च गृहित धरण्यात आला आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्नातून खर्च वजा जाता २५.४९ लाख शिल्लकीचा बजेट राहणार असल्याचा दावा पोहाणे यांनी केला आहे. चालू आर्थिक वर्षात कोणत्या विभागाकडून किती उत्पन्न मिळणार आहे. याचा लेखाजोखा त्यांनी मांडला आहे.