शाळाप्रवेशासाठी वाई बोथ बनले प्रति पंढरपूर; घडले सामाजिक एकतेचे दर्शन

    दिनांक :26-Jun-2019
गावातून पुस्तक पालखीची प्रदक्षिणा 

 
 
तभा ऑनलाईन टीम  
चांदूर रेल्वे,
गावात प्रत्येक अंगणासमोर रांगोळी...प्रत्येक घरासमोर पाट ठेवलेला...कुठे गजानन महाराजचा फोटो...तर कुठे समाज मंदिरासमोर महिला स्वागतासाठी सज्ज...बैल सुद्धा सजलेले...फुगे व हारांच्या आरासात मुलांची चहलपहल....बघता बघता टाळ मृदुंगाच्या निनादात सर्व गावं तल्लीन झालेलं...कुठे भीमगीते...तर कुठे चक्क महिलांचा फुगडीचा फेर...जणू त्या गावात आषाढी एकादशी सारखं प्रति पंढरपूर अवतरलं होते. पण, प्रसंग होता जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वाई बोथ येथील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचा.
 
 
 
 
अचानक अगोदरच्या दिवशी झालेल्या पावसामुळे गावकरी सुखावले होते. शिक्षकांनी यंदा शाळा प्रवेश वेगळेपणाने साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. गेल्या वर्षभरातील शाळेतील भौतिक व शैक्षणिक परिस्थितीत झालेल्या आमुलाग्र बदलामुळे गावकर्‍यांनी एकमताने आम्ही सर्व सहभागी होणार असल्याचे सांगितले. सकाळीच सर्व प्रवेश पात्र मुली गुलाबी लुगड्याचा पोशाखात सजलेल्या. त्यात शाहू महाराज यांची जयंती (सामाजिक न्याय दिन ) व जिजाऊ माता पुण्यतिथी असल्यामुळे विद्यार्थी शाहू महाराज, जिजाऊ मॉ, गाडगे महाराज,सावित्रीबाई फुले आणि विठ्ठल रुख्मिणीच्या वेशात नटलेले होते. गावकर्‍यांनी स्वतः बैलबंडीची सजावट करत त्यामध्ये प्रवेश पात्र मुलांना बसविले.
 
पालकांनी पालखी तयार करून त्यात विठ्ठल रुख्मिणीच्या प्रतीमेसह पुस्तकांची सजावट केली होती. गावातील भजनी मंडळींच्या पताका व टाळ-मृदुंगच्या निनादात गावकरी एकरूप झाले होते. सरपंच सुनीता शेळके व शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख भारती चौधरी यांनी सुद्धा पालखीला खांदा देत प्रदक्षिणेत पुढाकार घेतला. गावात प्रत्येक घरासमोर पालखी धारकांचे पायांची पूजा करण्यात आली. अखेर पालखी शाळेत पोहचली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले.