अन्य देशांबरोबर व्यवहार करताना देशहिताचाच विचार

    दिनांक :27-Jun-2019
पॉम्पेओ यांच्याबरोबर जयशंकर यांची द्विपक्षीय चर्चा 

 
नवी दिल्ली,
अन्य देशांबरोबर कोणताही व्यवहार करताना देशाचे हित कशात आहे, हे बघून मगच निर्णय घेतला जाईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांना सांगितले. पॉम्पेओ आणि जयशंकर यांच्यात आज द्विपक्षीय संबंधांवर व्यापक चर्चा करण्यात आली. त्यामध्ये रशियाकडून भारताने खरेदी करायच्या एस-400 क्षेपणास्त्र संरक्षक प्रणालीचाही उल्लेख निघाला. रशियाकडून संरक्षण सामुग्री खरेदी करण्यावर अमेरिकेकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. द्विपक्षीय चर्चेनंतर प्रसिद्धी माध्यमांबरोबरच्या वार्तालापामध्ये पॉम्पेओ यांनी भारत हा अमेरिकेचा महत्वाचा भागीदार असल्याचे नमूद केले. तसेच द्विपक्षीय संबंधांनी नवीन उंची गाठल्याचेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताला रशियाकडून क्षेपणास्त्र संरक्षक प्रणाली खरेदीवर परिणाम होऊ शकतो. याबाबत प्रश्‍न विचारल्यावर जयशंकर यांनी भारताचे अनेक देशांशी संबंध असल्यचे सांगितले. प्रत्येक देशाला इतिहास आहे. जे देशाच्या हिताचे आहे, तेच भारताकडून केले जाईल. संरक्षण भागीदारीचा भाग म्हणून प्रत्येक देशाचे हितसंबंधही जपले जायला पाहिजेत, असे जयशंकर म्हणाले. भारत आणि अमेरिकेमधील संरक्षण भागीदारीचे संबंध खोलवर रुजलेले आणि व्यापक आहेत. पॉम्पेओ यांच्याबरोबरच्या चर्चेदरम्यान उर्जा आणि व्यापाराबरोबरच अफगाणिस्तान आणि भारतीय-प्रशांत क्षेत्रातील मधील परिस्थितीबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादाच्या मुद्दयावर ट्रम्प प्रशासनाचा पाठिंबा मिळाल्याबद्दलही जयशंकर यांनी समाधान व्यक्‍त केले.
मंगळवारी रात्री भारतात पोहोचलेल्या पॉम्पेओ यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि भारत- अमेरिका संबंधांमधील विविध मुद्दयांवर चर्चा केली. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यापासून अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची ही पहिलीच भारत भेट आहे. जपानमधील “जी-20′ परिषदेदरम्यान मोदी आणि ट्रम्प यांची बैठक होणार आहे. पॉम्पेओ यांच्या भेटीकडे त्या चर्चेची पूर्वतयारी म्हणून बघितले जात आहे.