कोहली- धोनीच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताचे विडींजपुढे 269 धावांचे आव्हान

    दिनांक :27-Jun-2019
मँचेस्टर,
कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या दमदार अर्धशतकांच्या खेळीमुळे भारताने सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजसमोर २६९ धांवांचे लक्ष ठेवले आहे. कोहली-धोनी यांच्याबरोबरच हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांचेही उपयुक्त योगदान मिळाले. कोहलीने या सामन्यात ७२ धावा केल्या आणि धोनीने नाबाद ५६ धावांची खेळी साकारली.

 
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघा या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण भारताला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. रोहितला या सामन्यात फक्त १८ धावाच करता आल्या.
रोहित बाद झाल्यावर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी चांगलीच जमली. पण अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त दोन धावांची गरज असताना राहुल बाद झाला. केमार रोचने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. रोचचा हा स्पेल भन्नाट होता. कारण या स्पेलमध्ये रोहितनंतर विजय शंकर आणि केदार जाधव यांना बाद केले. या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. 

 
केदार जाधव बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला. या सामन्यात धोनीला यष्टीरक्षक शाई होपकडून जीवदान मिळाले. कोहलीने यावेळी अर्धशतक पूर्ण करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २० धावांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला, या यादीमध्ये आता कोहली अव्वल स्थानावर आहे. अर्धशतक झळकावल्यावर कोहली शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण एक चूक त्याला चांगलीच भोवली आणि शतक पूर्ण न करताच तो बाद झाला. कोहलीने ८२ चेंडूत ८ चौकारांच्या जोरावर ७२ धावा केल्या. कोहली बाद झाल्यावर धोनी आणि हार्दिक पंड्या यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.