डेव्हिस चषकासाठी भारतीय टेनिस संघ पाकिस्तानला जाणार?

    दिनांक :27-Jun-2019
नवी दिल्ली, 
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधली बिघडलेले राजकीय संबंध सुधारण्याच्या मार्गावर येताना दिसत आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतीय टेनिस संघ सप्टेंबरमध्ये डेव्हिस चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे. १९६४ साली भारताचा टेनिस संघ अखेरचा पाकिस्तानला गेला होता, यावेळी भारताने ४-० ने बाजी मारली होती. 

 
पाकिस्तानला जाण्यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. आमच्या मते सरकार आम्हाला परवानगी देण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेचे अध्यक्ष हिरोन्मय चॅटर्जी यांनी पीटीआयशी बोलताना माहिती दिली. “हा दोन देशांमधला सामना नाहीये, डेव्हिस चषक स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळं महत्व आहे. आम्ही स्पर्धेसाठी पाकिस्ताला जाऊ असा मला आत्मविश्वास आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये आम्ही यासंदर्भात अधिकृत घोषणा करु. इस्लामाबादमध्ये दोन्ही संघांचे सामने खेळवले जातील.”
२००६ साली पाकिस्तानचा संघ मुंबईत स्पर्धेसाठी आला होता. या दरम्यान भारताने अटीतटीच्या लढाईत ३-२ ने बाजी मारली होती. त्यावेळी महेश भुपती, लिएँडर पेस, रोहन बोपण्णा आणि प्रकाश अमृतराज यांचा भारतीय संघात समावेश होता. मध्यंतरी भारत सरकारने खेळाडूंसंदर्भात आपल्या व्हिसा नियमांमध्ये शिथीलता आणली होती. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारत सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.