टीम इंडिया श्रीलंका, बांगलादेशशी मुद्दाम हरणार

    दिनांक :27-Jun-2019
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने केला आरोप
मँचेस्टर,
भारतीय संघ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सध्या ५ पैकी ४ सामने जिंकून ९ गुणांवर आहे. भारतीय संघाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. भारताचे पहिल्या फेरीतील एकूण ४ सामने शिल्लक आहेत. या ४ सामन्यांपैकी किमान २ सामने भारताने जिंकले तर भारताचे सेमीफायनलचे तिकीट निश्चित होणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ पाकच्या संघाला सेमीफायनलापासून वंचित ठेवण्यासाठी काही सामने जाणूनबुजून हरू शकते, असा आरोप पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी केला आहे. 

 
पाकिस्तानच्या एका कार्यक्रमात बासित अली याला क्रिकेट जाणकार म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी सूत्रसंचालकाने त्यांना विचारले की पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग रोखण्यासाठी भारताचा संघ मुद्दाम सामने पराभूत होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना बासित अली म्हणाले की पाकिस्तान सेमीफायनलमध्ये जाऊ नये म्हणून भारत मुद्दाम श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याविरोधात होणार सामना पराभूत होईल. ऑस्ट्रेलियादेखील मुद्दाम भारताविरुद्ध सामना हरला. एवढेच नाही तर १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ जाणूनबुजून पाकिस्तान विरोधात पराभूत झाला होता. कारण त्यांना सेमीफायनलचा सामना त्यांच्या भूमीत खेळायचा होता, असा आरोप बासित अली यांनी केला.
 
 
विश्वचषकात भारतीय संघ अपराजित संघ आहे. भारताचे सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्वित आहे. भारताचे श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंड यांच्याविरोधात सामने होणार आहेत. याउलट पाकिस्तानचा संघ सध्या विश्वचषक स्पर्धेत ‘करो या मरो’ स्थितीत आहे. पण भारताने पराभव केल्यानंतर मात्र पाकने चांगला कमबॅक केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. पाठोपाठ अपराजित असलेल्या न्यूझीलंडविरोधातही त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्पर्धत आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत.