हरवलेलं मातृत्व...

    दिनांक :27-Jun-2019
अंजली आवारी 
 
परवा सहज यू ट्यूबवर व्हिडीओ बघत असताना, अपर्णाताई रामतीर्थकार यांच्या भाषणाचा व्हिडीओ बघितला. त्याच क्षणी अंगावर काटा आला. त्यांनी त्या भाषणात आईच्या हरविलेल्या मातृत्वाची कहाणी सांगितली. एक आई जी करीयरवेडी, हुशार व कर्तृत्ववान आहे. पण, या सगळ्यात बाळाप्रती असलेलं तिचं कर्तव्य ती विसरली आहे.
 
एका घरात दोन लहान मुलं आणि त्यांचे आई-वडील राहतात. मोठा मुलगा नवव्या वर्गात आहे व लहान मुलगा गतिमंद जन्माला आला. गतिमंद असल्यामुळे त्याला आईच्या विशेष काळजीची गरज होती. पण, ध्येयवेडी आई त्याला वेळ देऊ शकत नव्हती. कारण, तिला तिचं व्यावसायिक आयुष्य फार महत्त्वाचं वाटत होतं. एक दिवस त्या गतिमंद बाळाला ताप होता, त्यामुळे तिच्या मोठ्या मुलाने तिला विनंती केली की, आई तू आजच्या दिवस फक्त सुट्टी घे, कारण बंटीला सांभाळणं मला जमणार नाही. त्याला तुझी (आईची) आवश्यकता आहे. पण, आईने ती परिस्थिती समजून न घेता ती आपल्या कामासाठी घराबाहेर पडली.
 

 
 
बंटीला (गतिमंद बाळाला) खूपच ताप होता. तो खूप रडत होता. त्याला त्या क्षणी मायेची ऊब हवी होती. वडिलांना फोन केला असता तेसुद्धा व्यग्र असल्यामुळे येऊ शकले नाहीत. बंटीची संपूर्ण जबाबदारी त्याच्या मोठ्या भावावर पडली, जी त्याला पेलवत नव्हती. कारण तोसुद्धा लहानच होता ना! लहान भावाचं रडणं, बावरणं, त्याचा त्रास याने तोसुद्धा भांबावून गेला. काय करावं, कसं समजवावं हे त्याला कळेना व अखेर त्याच्या मनावर झालेले आघात. त्याने त्याच्या कृतीतून दाखवून दिले. त्या मोठ्या भावाने पंख्याला लटकून आत्महत्या केली व सुसाईट नोटमध्ये आईला म्हणाला- ‘‘आई सॉरी, मला बंटीची आई होता आलं नाही.’’
 
हे वाक्य ज्यांना कळलं त्यांचं हृदय अगदी भीतीने शहारलं. एक प्रश्न आपसूकच मनात आला की, यात चूक कुणाची?
आईची, वडिलांची, परिस्थितीची की आपण विसरत चाललेल्या भावनिक जाणिवांची? आईच्या मातृत्वाचा वा वडिलांच्या वात्सल्याचा आज विसर पडतोय का? आपण व्यावसायिक स्पर्धेत इतके गुंतलोय की, भावनिक नातीच विसरतोय. आपल्याला, आपल्याच बाळाप्रती असलेलं कर्तव्य काय? याची जाणीव इतरांनी करून देण्याची परिस्थिती आज निर्माण झालीय का?
 
जगात आईचं व बाळाचं नातं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. पण, त्या नात्यावर आज धूळ जमतेय व या नात्याचीच ही परिस्थिती असेल तर आपण इतर नात्यांना कुठल्या पारड्यात ठेवायचं? इथे चूक फक्त आईचीच नाही, तर पालक म्हणून वडीलही आपल्या कर्तव्याला चुकलेच की. त्यांनीही आपली जबाबदारी कुठे स्वीकारली? आई-वडिलांचा या परिस्थितीत योग्य तो संवाद झाला असता वा त्यांनी तो एकमेकांशी साधला असता. तर त्या मुलाचा जीव वाचला असता.
 
लहान मुलांच्या आत्महत्या हा खूप मोठा विषय आहे. परंतु, आपल्या नात्यातील संपत चाललेला संवाद हे त्यातील मुख्य कारण आहे. मुलांकडून अपेक्षा करताना पालक स्वत: त्यांच्या मुलांच्या अपेक्षांची पूर्तता कितपत करतात, हे पाहणे फारच महत्त्वाचे ठरते.
 
याउलट काही ठिकाणी पालक मुलांच्या बाबतीत इतके ‘पझेसिव्ह’ आहेत की ते त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, कुठलंही नातं जपताना, सांभाळताना त्या नात्यात योग्य तो बॅलन्स असायला हवा. नाहीतर ते नातं कुठेतरी धडपडतंच. आपण प्रत्येकानेच आपल्या करीयरच्या शिखरावर पोहचलं पाहिजेच. कारण आपणास या जगाच्या सोबत चालायचंय. पण, हे करताना आपण काय गमावतोय, याचीसुद्धा पूर्ण जाणीव ठेवली पाहिजे.
 
म्हणूनच, ध्येयवेडे असा, परंतु परिस्थितीनुसार आपल्या प्राथमिकतांची निवड करा. कधी नफा कधी तोटा, हेच आयुष्य असतं. सगळं गोड मानून पुढे जायचं असतं...