धक्कादायक ! अल्पवयीन मुलांची मोठी तस्करी उघड

    दिनांक :27-Jun-2019
मुलांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात एकाला पकडले
४० मुले ताब्यात
 
नागपूर: अल्पवयीन मुलांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात राजनांदगाव येथील आपीएफच्या पथकाने एकाला पकडून त्याच्या ताब्यातून ४० मुलांना ताब्यात घेतले.
मो. शाकीर हुसेन अब्दुल रहीम (२२) शाकीन माधोपूर, जि. भागलपूर (बिहार) असे पकडण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.
 
 
 
 
मो. शाकीर हा १२६१० हावडा-मुंबई मेलने या मुलांना घेऊन जात होता. ही मुले एस २ आणि एस ५ या डब्यातून प्रवास करीत होते. याच डब्यातून स्मिता नावाची एक वकील प्रवास करीत होती. अल्पवयीन मुले एकटेच प्रवास करीत असल्याने वकील महिलेला संशय आला. तिने त्या मुलांची विचारपूस केली. त्यावेळी त्या मुलांची तस्करी होत असल्याचे वकील महिलेच्या लक्षात आले. लगेच त्यांनी रायपूरच्या पोलिस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. त्यानंतर राजनांदगावच्या आरपीएफला ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच आरपीएफने राजनांदगावच्या स्टेशन मास्तरला जास्त वेळ गाडी थांबवून ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर मो. शाकीरसह ४० मुलांना गाडीतून खाली उतरविले.
पोलिसांनी मो. शाकीरची विचारपूस केली असता तो या मुलांना नांदूरा (जि. बुलढाणा) येथील मदरस्यामध्ये शिक्षणासाठी नेत असल्याचे सांगितले. मात्र, त्यासंदर्भात त्याच्याकडे कुठलीही कागदपत्रे मिळून आली. त्यातही काही मुलांची तिकीटे होती, तर काही मुले विनातिकीट प्रवास करीत होते. ही सर्व मुले ८ ते १२ वयोगटातील असून या मुलांना कामासाठी नेण्यात येत असल्याची माहिती आहे.