गोतस्करीसाठी आता जंगलाचा आधार

    दिनांक :27-Jun-2019
दिवसभर जंगलात बांधलेल्या जनावरांची रात्री होते तस्करी
70 जनावरे पोलिसांनी घेतली ताब्यात
भंडारा: गोवंशाची तस्करी थांबावी म्हणून कितीही कायदे केले तरी जोपर्यंत त्या कायद्याचा धाक बसत नाही, तोपर्यंत ती थांबू शकत नाही, हे वास्तव आहे. कायदे केल्यानंतर त्याची अमलबजावणी करणारी यंत्रणा ढिम्म असेल तर ते निरर्थक ठरणारच ! भंडारा जिल्हयात गोवंशाच्या तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता यासाठी चक्क जंगलाचा आधार घेत आहेत. आतापर्यंत पोलिसांच्या नावाने बोंबा मारणा-यांना आता वनविभागाच्या नावानेही खडे फोडण्याची वेळ आली आहे. घनदाट जंगलाचा फायदा घेत दिवसा जनावरे बांधून ठेवीत रात्रीच्या वेळी त्यांची वाहतुक करण्याचे प्रकार पूढे येत आहेत. 27 जून रोजी तुमसर पोलिसांनी अशाच 75 गोवंशाला ताब्यात घेत गोशाळेत पाठविले.
 
 
 
गोहत्या आणि गोवंशाची तस्करी थांबावी म्हणून सरकारने कायदे केले आहेत. परंतु त्याचा कुणावरही परिणाम झाल्याचे दिसत नाही. ऐवढेच नाही तर प्रत्येक जिल्हा स्थानी प्राणी क्लेष समिती असते. या समितीच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा आढावा घेतला जातो. त्यात गोवंशाची कत्तल आणि तस्करी हा विषयही चर्चेला येणे अपेक्षीत आहे. परंतु या समितीच्या बैठकाचा होत नसल्याचे वास्तव आहे. जिल्हयातून मोठ्या प्रमाणावर गोवंशाची तस्करी होत असल्याची ओरड नेहमीच हिंदूत्ववादी संघटनांकडून केली जाते. अनेकदा पोलिसांच्या मदतीने गोवंशाची निर्दयीपणे होणारी वाहतूक थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातात. तरिही तस्करी करणा-यांवर वचक बसत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे.
चार दिवसांपूर्वी तुमसर तालुक्यातील अंबागड जंगल परिसरातून 60 ते 70 गोवंश बेवारस बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर बरीच टाळाटाळ करीत पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान 26 रोजी पून्हा तुमसर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पवनारा येथे जंगल व्याप्त भागात असलेल्या एका शेतात 72 गोवंश बांधून ठेवले बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सुरुवातीला दूर्लक्ष केले गेले. मात्र आज 27 रोजी सकाळी जंगलात आणि इतरत्र विखरुरलेल्या 72 जनावरांना ताब्यात घेत पोलिसांनी गोशाळेत पाठविले. विशेष म्हणजे या जनावरांची मालकी सांगणारा कुणीही पोलिसांपर्यंत आला नसल्याचे पोलिस निरिक्षक सिडाम यांनी 'तभा'शी बोलताना सांगितले.
या सर्व प्रकारावरुन आता घनदाट जंगल हे, गो तस्करांसाठी एक माध्यम झाले असल्याचे स्पष्ट होते. दिवसभर ही जनावरे जंगलात बांधून ठेवून रात्रीच्या वेळी अंबागड मार्गाने मध्यप्रदेशात तस्करी केली जात असल्याची माहिती आहे. हा परिसर पूर्णपणे जंगलव्याप्त असल्याने जंगलमार्गाने ही तस्करी सोपी होते. अंबागड येथे तस्करांचा मुख्य अड्डा असल्याचे समजते. विशेष म्हणजे दिवसाकाठी 200 जनावरांची निर्यात होत असल्याची माहिती आहे.
आधीच गोतस्करीच्या बाबतीत पोलिसांची भुमिका संशयास्पद असताना आता वनविभागाच्या अधिका-यांच्या बाबतीतही शंका उपस्थित होत आहेत. जंगलात कित्येक तास गोधन बांधून ठेवले जात असतानाही अधिकारी, कर्मचा-यांच्या लक्षात हा प्रकार कसा येत नाही, हा प्रश्नच आहे. सामान्य लोकांना जे दिसते, ते वनविभागाच्या कर्मचा-यांना दिसत नसेल तर घेतल्या जाणा-या शंकांकडे दूर्लक्ष करुन चालणार नाही. कायदे, नियम असतानाही सर्वांच्या डोळयादेखत गोवंशाची तस्करी होत असेल तर तस्करांचे मनोबल किती उंचावले आहे, याची कल्पना येते. अशावेळी यावर आळा घालण्यासाठी असलेली यंत्रणा कुचकामी ठरल्याचे स्पष्ट जाणवते.