चंद्राबाबूंना आत्मपरीक्षणाची गरज!

    दिनांक :27-Jun-2019
दिल्ली वार्तापत्र 
श्यामकांत जहागीरदार  
 
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी, स्वत:ला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार समजणारे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम्‌चे एकेकाळचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांची स्थिती राजकीयदृष्ट्या अतिशय दयनीय झाली आहे. पंतप्रधानपद तर त्यांना मिळाले नाही, पण हातात असलेले मुख्यमंत्रिपदही त्यांना गमवावे लागले.
 
नायडू स्वत:ला विरोधी पक्षांच्या ऐक्याचे सूत्रधार समजत होते, पण राजकारणाने अशी जोरदार कलाटणी घेतली की, नायडू तेलगू देसम्‌ पक्षाचेही सूत्रधार राहिले नाही. त्यांची स्थिती, व्हायचे होते हीरो पण झाले झीरो, अशी झाली. लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या पक्षाचे पार बारा वाजले. राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नाही, चुकीचे निर्णय घेतले की काय होते, याचे चंद्राबाबू नायडू हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. 

 
 
नायडू हे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात रालोआत होते. मात्र, मोदी सरकारचा कार्यकाळ संपत आला असताना त्यांनी आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळावा, या मागणीवरून रालोआ सोडली. वास्तविक पाहता केंद्राने त्यापेक्षा कितीतरी अधिक निधी आंध्रला दिला होता. त्यामुळे विशेष दर्जा मिळावा, ही मागणी रेटून धरण्यात काहीही अर्थ नव्हता. पण, एखादी मागणी किती ताणायची, याचे तारतम्य नायडू राखू शकले नाहीत. आंध्रप्रदेशला विशेष दर्जा तर नायडू मिळवून देऊ शकले नाहीत, उलट स्वत:चा आणि पक्षाचा जनमानसातील दर्जाही गमावून बसले.
 
या मागणीवरून तेलगू देसमच्या खासदारांनी याआधीच्या लोकसभेत प्रचंड गोंधळ घातला होता. नायडू यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती असली तरी ही मागणी मान्य करणे मोदी यांना शक्य नव्हते. कारण, आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी मान्य केली की, बिहार आणि अन्य राज्येही अशी मागणी करणार होते. त्यामुळे केंद्र सरकारला आंध्र प्रदेशची ही मागणी मान्य करणे शक्य नव्हते. मोदी सरकारने वेगवेगळ्या मार्गाने आंध्र प्रदेशला मदत करण्याची तयारी दर्शवली, पण नायडू विशेष दर्जाच्या मागणीवरच अडून बसले.
 
आपल्या हाताने आपल्या पायावर दगड पाडून घेणे म्हणजे काय, हे नायडू यांच्या नंतरच्या वागणुकीने दिसून आले. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही, हे गृहीत धरून नायडू यांनी आपली पूर्ण मांडणी केली होती. दुसर्‍या शब्दांत सांगायचे, तर चुकीच्या पायावर आपली पंतप्रधानपदाची इमारत उभी करण्याचा नायडू यांचा प्रयत्न होता. त्यामुळे अशी इमारत उभी राहणे शक्यच नव्हते. त्यांना आणखी एक हादरा बसला. यानंतर चंद्राबाबूंसाठी रालोआचे दरवाजे कायमचे बंद, अशी घोषणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली आणि त्याचाही नायडूंच्या पक्षावर आणि निवडणुकीवरही प्रतिकूल परिणाम झाला.
 
राजकीय परिस्थितीचा अंदाज, लोजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना अचूक येतो, असे म्हणतात, त्यानुसार ते आपल्या राजकीय भूमिका ठरवतात आणि राजकीयदृष्ट्या फायद्यातही राहतात. त्यात नायडू कमी पडले. नायडू यांचे सर्व राजकीय आराखडे फोल ठरले. याची किंमत त्यांना स्वत:लाच चुकवावी लागली. राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून ते बाहेर फेकले गेले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने नायडू यांचे राजकीय आराखडे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले.
 
राज्यसभेतील त्यांच्या पक्षाच्या सहापैकी चार खासदारांनी आपला गटच भाजपात विलीन करून भाजपात प्रवेश केला. नायडू यांनी याची स्वप्नातही कल्पना केली नसावी! या सार्‍या नाटकीय घडामोडी होत असताना नायडू, परदेशात उन्हाळी सुट्‌ट्या घालवत होते. अशा संकटांची आपल्या पक्षाला सवय असल्याची प्रतिक्रिया नायडू यांनी व्यक्त असली, तरी यातून त्यांची हतबलताच दिसून येते. राज्यसभेत त्यांच्या पक्षाचे दोन, तर लोकसभेत तीन खासदार उरले आहेत. घर फिरले की घराचे वासे फिरतात, याचा अनुभव नायडू सध्या घेत आहेत.
 
खासदारांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला, असे म्हणण्याचा अधिकारही नायडू यांना उरला नाही. कारण, नायडू यांचा राजकीय इतिहासही खंजीर खुपसण्याचाच राहिला आहे. नायडू यांनी तर आपल्या सासर्‍यांच्या म्हणजे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांच्या पाठीतच खंजीर खुपसला. नुसता खंजीरच खुपसला नाही, तर त्यांचा पक्ष- तेलगू देसम्‌ही बळकावला. त्यामुळेच या घडामोडींवर नायडू यांना काही बोलता आले नाही, मूक गिळून गप्प बसावे लागले.
 
मुख्यमंत्रिपदी असताना नायडू यांनी प्रचंड मनमानी केली. आंध्रप्रदेशात आपणच कायम सत्तेवर राहणार, कुणीच आपल्याला सत्तेवरून हटवू शकणार नाही, असा समज त्यांनी करून घेतला. त्यामुळे राज्यातील जनमत आपल्या विरोधात चालले, याचा अंदाजही त्यांना आला नाही. जगनमोहन रेड्‌डींची ताकद राज्यात वाढत चालली होती, नायडूंच्या आसनाला सुरुंग लागत होता, पण नायडू मात्र पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहात देशभर विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी फिरत होते. एवढे जर नायडू प्रचारासाठी म्हणून राज्यभर फिरले असते, तर त्यांचा इतका दारूण पराभव तरी झाला नसता.
 
सत्तेवर येताक्षणी नवे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्‌डी यांनी चंद्राबाबू नायडू यांना दोन झटके दिले, एक तर त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी केली. विमानतळावर नायडू यांची झडती घेतली जात असल्याचे छायाचित्र प्रकाशित झाले. दुसरा म्हणजे आंध्रप्रदेशची नवीन राजधानी अमरावतीत ‘प्रजावेदिका’ नावाचा नायडू यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बांधलेला बंगला जमीनदोस्त केला. नायडू यांनी 2017 मध्ये हा बंगला बांधला होता, आठ कोटी रुपये यासाठी खर्च आला होता. आता तो बंगला बुलडोझर लावून पाडला जात आहे.
 
मुख्यमंत्रिपदाची सूत्रे घेतल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत जगनमोहन रेड्‌डी यांनी हा बंगला पाडण्याची घोषणा केली होती. नायडू यांनी बंगला बांधताना सर्व सरकारी नियमांचे पालन केले असते, तर नव्या सरकारला त्यांचा बंगला पाडता आला नसता. मात्र, नव्या सरकारला हा बंगला पाडता आला, याचाच अर्थ बंगला बांधताना कोणत्याही आवश्यक त्या सरकारी परवानग्या नायडू यांनी घेतल्या नव्हत्या. आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही, असा दर्प सत्तेवर असलेल्या नेत्यांमध्ये निर्माण होत असतो. नायडू त्याचेच बळी ठरले आहेत.
 
चंद्राबाबू नायडू हे चांगले प्रशासक म्हणून ओळखले जातात. जवळपास 15 वर्षे त्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवले. 2004 ते 2014 पर्यंत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. एन. टी. रामाराव यांच्याकडून त्यांनी तेलगू देसम्‌ पक्ष हिसकावला असला, तरी त्या पक्षाला त्यांनी तेवढेच खंबीर नेतृत्व देत सत्तेवर आणले, हे नाकारता येत नाही.
 
नायडू यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. काँग्रेसचे आमदार म्हणून ते सर्वप्रथम 1978 मध्ये चंद्रगिरी मतदारसंघातून विजयी झाले. एवढेच नाही, तर काँग्रेसच्या मंत्रिमंडळातही चित्रपट तंत्रज्ञान मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. या मंत्रिपदामुळेच ते एन. टी. रामाराव यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे जावईपण झाले.
 
1982 मध्ये रामाराव यांनी तेलगू देसम्‌ची स्थापना केली, 1983 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलगू देसम्‌च्या उमेदवाराने काँग्रेसचे असलेल्या नायडू यांचा पराभव केला. त्यानंतर काही दिवसांतच नायडू तेलगू देसम्‌मध्ये सहभागी झाले. रामाराव यांच्या सरकारविरुद्ध बंड झाले, त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. यावेळी राजभवनात रामाराव यांच्या बाजूने आमदारांची परेड करत नायडू यांनी आपले राजकीय कौशल्य दाखवले तसेच रामाराव यांचे सरकारही वाचवले. याचा त्यांना नंतरच्या राजकीय जीवनात फायदा झाला.
 
नंतर काळाच्या ओघात नायडू इतके बदलले की त्यांनाही ते समजले नाही. ते जनतेपासून दूर गेले, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेनेही त्यांना दूर केले. जनतेने आपल्याला का नाकारले, आपलेच सहकारी आपल्याला सोडून का जात आहेत, याचे तसेच आपल्या वागणुकीचेही नायडू यांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. आपल्याकडून झालेल्या चुका नायडू यांनी वेळीच दुरुस्त केल्या, तर स्वत:ला आणि आपल्या पक्षालाही नायडू सांभाळू शकतील. अन्यथा कुणीच त्यांना वाचवू शकणार नाही!