महाराष्ट्रात घरे महागणार ?

    दिनांक :27-Jun-2019
मुंबई: राज्यात सिमेंटच्या किमतीवर राज्य सरकारचे नियंत्रण नसल्याची कबुली राज्य सरकारने गुरुवारी विधानपरिषदेत दिली. त्यामुळे सिमेंटचे दर वाढण्याची शक्यता असून, मुंबईसह राज्यभरात घरांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
 
 
 
राज्यात सिमेंट बॅगचे दर एप्रिल महिन्यात प्रतिबॅग 320 ते 350 रुपयांपर्यंत गेले असून, त्याचा परिणाम राज्यात सुरू असलेल्या बांधकामांवर होणार आहे. ही बाब खरी आहे का, असा तारांकित प्रश्न गिरीश व्यास, अनिल सोले यांनी विचारला होता. त्याला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी लेखी उत्तर दिले. केंद्र शासनाने सिमेंटचे उत्पादन, किंमत आणि वितरण यावरील निर्बंध काढून टाकले आहेत. महाराष्ट्र सिमेंट (नियंत्रण) आदेश 1990 च्या अधिसूचनेद्वारे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत सिमेंटच्या किंमतीवर राज्य सरकारचे नियंत्रण नाही, असे त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.