'दोस्ताना'मध्ये कार्तिक- जान्हवीची जोडी

    दिनांक :27-Jun-2019
मुंबई:
प्रियांकाचा 'देसी गर्ल' गाण्यावर डान्स असो किंवा जॉन - अभिषेकची 'हटके' मैत्री.... ही सगळीच समीकरणं जुळून आल्यानं 'दोस्ताना' चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाच्या सिक्वेलच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. 'दोस्ताना २' मध्ये मुख्य भूमिकेत जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यनची जोडी झळकणार आहे.
 
 
'दोस्ताना'च्या दुसऱ्या भागाची निर्मितीदेखील निर्माता- दिग्दर्शक करण जोहर करणार आहे. करणनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दल आणि चित्रपटातील कलाकारांच्या नावाबद्दलचा खुलासा केला. 'आम्ही पुन्हा एकदा धम्माल, मस्ती असलेला चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झालोय.' असं त्यानं लिहिलं आहे.
 
 
'दोस्ताना'च्या सिक्वेलबाबात बोलताना करण जोहर म्हणाला की, 'जान्हवी आणि कार्तिक सोबत 'दोस्ताना'चा दुसरा भाग बनवण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. धर्मा प्रोडक्शनचा कार्तिकसोबत हा पहिलाच चित्रपट आहे त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची आम्हाला उत्सुकता आहे. जान्हवी आणि कार्तिकव्यतिरिक्त एक नवा चेहराही चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या अभिनेत्याचे नाव आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत.'