स्वस्थ वारीचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सज्ज!

    दिनांक :27-Jun-2019
पुणे:  संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांच्या मार्गावर असणाऱ्या सर्व मुक्कामांवर आरोग्य सेवा प्रदान करण्याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची चमू सिद्ध झाली आहे. या दोन्ही पालख्यांच्या मार्गावर असणाऱ्या 35 ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या दृष्टीने दोन्ही पालखी मार्गांवर प्रत्येकी 35 डॉक्टरांच्या टीम चे नियोजन विद्यापीठाने केले आहे. त्याचसोबत प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी 20 ते 50 डॉक्टरांचे मनुष्यबळ आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वारीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये, साथीचे रोग पसरु नये याकरिता देखील वारकऱ्यांचे प्रबोधन करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाकडून जनजागृती अभियान चालविले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक चे कुलगुरु डॉ दिलीप म्हैसेकर यांनी दिली आहे. स्वस्थ वारीचा संकल्प सिद्धी पर्यंत नेण्यासाठी विद्यापीठाची चमू सिद्ध झाली असून या शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांना प्रभावी प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे असेही ते पुढे म्हणाले.
 
 
पुणे विभागातल्या सर्व आरोग्य विज्ञान महाविद्यालयातील महाविद्यालयीन व रुग्णालयीन प्राध्यापक, कर्मचारी, पदव्युत्तर विद्यार्थी, आंतरवासिता प्रशिक्षणार्थी व विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून स्वस्थ वारीचा प्रयत्न एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच केला जात आहे. या शिबिराच्या ठिकाणी नियोजन व मदत करण्याकरिता पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध राहणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री राजेश पांडे यांनी सांगितले.
सदर शिबिराच्या आयोजनाकरिता विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ कालिदास चव्हाण, शिबिर आयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ आशुतोष गुप्ता, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ संदीप गुंडरे व समन्वयक डॉ अनुपमा शिंपी यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात नियोजन बैठक पार पडली असून त्यामध्ये पुणे विभागातील जवळपास ५० महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी डेंटल व्हॅन्स, रुग्णवाहिका, ऑपथेमिक व्हॅन यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ कालिदास चव्हाण यांनी केले. शिबिराच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानांतर्गत नेत्रदान, रक्तदान, अवयवदान याविषयी गैरसमज दूर करण्यात येणार असून आर्थिक दृष्टीने कमकुवत नागरिकांसाठी औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत देण्याकरिता शासनाकडून राबविण्यात येणार येत असलेल्या विविध योजनांची माहिती सर्व वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा विद्यापीठाचा मानस आहे जेणेकरुन या योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यास मदत होईल असे शिबीर आयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ आशुतोष गुप्ता यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून औषधांची व्यवस्था केली जाणार असल्याचे उपसंचालक डॉ देशमुख यांनी सांगितले. सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी, संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य व समन्वयक हे परिश्रम करीत आहेत.