नागपूर मेट्रोचे नवीन वेळापत्रक जाहीर

    दिनांक :27-Jun-2019
नागपूर: मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत मेट्रो रेल्वेला अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. प्रस्तावित योजनेनुसार मेट्रोची पहिली फेरी सकाळी आठ वाजतापासून सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन येथून सुरू होईल. तसेच खापरी मेट्रो स्टेशनवरूनदेखील सुरू होईल. प्रत्येक तासावर सकाळी आठ ते सायंकाळी सातपर्यंत मेट्रो फेऱ्या नागरिकांकरिता सुरू राहतील. तसेच सीताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी सात वाजता व खापरी स्टेशन ते सीताबर्डी स्टेशनकरिता आठ वाजता मेट्रोची शेवटची फेरी होईल. दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरू करणार आहे. याचे औपचारिक उद्‌घाटन २८ जूनला सकाळी आठ वाजता सीताबर्डी स्थानकावर होणार आहे.

 
 
 सध्या सकाळी आठ, साडेनऊ आणि ११ अशा फेऱ्या तसेच दुपारी साडेतीन, साडेपाच आणि सायंकाळी साडेसहा वाजता अशा तीन म्हणजे एकंदरीत सहा मेट्रोच्या प्रवासी सेवा सुरू होत्या.
रिच-1च्या मार्गिकेवर प्रवासी सेवेमध्ये वाढ झाल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मुख्यत: मिहान आणि हिंगणा येथील औद्योगिक वसाहतीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिहान सेझ या भागात स्थित कंपन्यांमध्ये ये-जा करणे सोयीचे होणार आहे. मेट्रोची प्रवासी सेवा त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार कार्यरत असावी याकरिता बऱ्याच दिवसांपासून मेट्रो प्रशासनाकडे त्यांनी मागणी केली होती. ती लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. महामेट्रो लवकरच एअरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि नागपूर विमानतळादरम्यान शटल सेवादेखील सुरू करीत आहे. ज्यामुळे मेट्रो ट्रेन आणि विमानतळावरील सेवा जोडल्या जाणार व नागरिकांनादेखील सोयीचे ठरणार.