परागने दिली प्रेमाची कबुली

    दिनांक :27-Jun-2019
भांडण, वादविवाद, मैत्री, अफेअर या सगळ्या गोष्टींमुळे ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिझनमध्ये राजेश श्रृंगारपुरे आणि रेशम टिपणीस या दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा झाल्या. त्यानंतर आता दुसऱ्या सिझनमध्येही एक प्रेमकहाणी चर्चेत आहे. पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले हे या सिझनमधील लव्हबर्ड्स आहेत. परागने अनेकदा रुपालीसाठी असलेलं प्रेम अप्रत्यक्षपणे व्यक्त केलं आहे. आता मात्र त्याने उघडपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
 
 
‘वूट’च्या ‘अनसीन अनदेखा’च्या व्हिडिओत परागने त्याच्या प्रेमाची कबुली दिल्याचं पाहायला मिळतं. ”रूपालीच्‍या तरूण मित्रांनो, तिचे फॉलोअर्स, चाहते व तिच्‍या मागे लागलेल्‍या सगळ्या तरूणांना मला एक संदेश द्यायचा आहे. प्रयत्‍न चालू ठेवा, बट शी इज माइन, शी इज ओन्‍ली माइन (ती फक्त माझी आहे),” असं पराग कॅमेऱ्यात पाहून म्हणत असतो. त्यापुढे रुपाली म्हणते, ”येस, बट अॅज ए वेरी गुड फ्रेण्‍ड (होय पण एक चांगली मैत्रीण म्हणून)”
मित्र म्हणून आम्हाला एकमेकांची खूप काळजी आहे, असं रुपाली पुढे म्हणते. एकीकडे पराग मोकळेपणाने त्याच्या भावना व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे रुपाली तो फक्त मित्र असल्याचं म्हणतेय. आता हे एकतर्फी प्रेम पुढे कोणतं वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.