प्रकल्पग्रस्तांचे चक्काजाम आंदोलन आंदोलकांना केली अटक

    दिनांक :27-Jun-2019
अमरावती: प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. रहाटगांव येथे राष्ट्रीय महामार्गावर मुख्य चक्काजाम आंदोलन झाले. पण, ते औटघटकेचे ठरले. पोलिसांनी यावेळी शेकडो आंदोलकांना अटक केली.
 

 
 
अमरावती विभागातील सिंचन अनुशेष निर्मूलनाकरिता सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले. धडक मोहीमेअंतर्गत भूसंपादन करण्यात आले. परिपत्रक काढून शेतकर्‍यांची जमिन वाटाघाटी केल्याचे दर्शवून मिळविली. यासाठी दहशत निर्माण करणे, दडपण आणण्यासारखे प्रकार करण्यात आले. 2006 नंतर जमिनी अत्यंत कमी दराने संपादीत केल्यात. सरकारने दबावतंत्राचा वापर केल्याने प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करीत आहेत. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन सुरु आहे. समितीच्या वतीने आज जिल्हाभरात चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. यानुसार अमरावती, चांदूर रेल्वे, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर, परतवाडा आदी ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी चक्काजाम आंदोलन करून सरकारच्या धोरणाचा विरोध दर्शविला. रहाटगांव येथील राष्ट्रीय महामार्ग येथे प्रकल्पग्रस्त दुपारी बारा वाजताचे सुमारास जमले होते. शेकडो प्रकल्पग्रस्तांनी हातात फलक घेवून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी जोरदार घोषणा दिल्या. प्रकल्पग्रस्तांच्या चक्काजाम आंदोलनात, महिला, पुरुष व युवकांसोबत वयोवृद्ध प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रकल्पग्रस्तांनी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त नेमण्यात आला होता. पोलिस उपायुक्त शशीकांत सातव यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलीसांचा फौजफाटा तैनात होता. प्रकल्पग्रस्तांनी चक्काजाम आंदोलन केल्याने या मार्गावर दोन्ही दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेवून त्यांना बडनेरा व अन्य पोलीस ठाण्यात हलविले. प्रकल्पग्रस्तांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आंदोलनात समितीचे मनोज चव्हाण, साहेबराव विधळे, अशोक मोहोड, महादेव चव्हाण, अमोलसिंग परिहार, गोलू सिंग परिहार, विजय मोहोड, अंकुश चौरे आदी सहभागी झाले होते.
 
आमचे आंदोलन चिरडले
लोकशाही मार्गाने आम्ही चक्काजाम आंदोलन पुकारले होते. शांततेच्या मार्गाने आम्ही ते करीत होतो. मात्र, पोलिसांनी आमचे आंदोलन चिरडले. हा आमच्यावर आणखी एक अन्याय आहे. बळजबरी करून आम्हाला पोलिसांनी गाडीत बसवले. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. आता वेगळ्यापद्धतीने आम्ही आंदोलन करू, असे प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.