ICCWorldCup2019 : विराटने मोडला सचिनचा 'हा' विक्रम

    दिनांक :27-Jun-2019
मँचेस्टर,
भारताचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ७२,  ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८२, तर पाकिस्तानविरुद्ध ७७ धावांची दमदार खेळी केली. पण, या वर्ल्डकपमध्ये त्याला अजूनपर्यंत एकही शतक ठोकता आलेले नाही. अफगाणिस्तानबरोबरच्या सामन्यातही तो ६७ धावांवर बाद झाला. जर त्याने या सामन्यात शतक ठोकले असते तर त्याने भारताचा सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा यांच्या नावावर संयुक्तरित्या असलेला सर्वात जलद २० हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडला असता. पण, अखेर विराटने हा विक्रम वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मोडला. 

 
           
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये रोज जुने विक्रम मोडले जात आहेत आणि नवे विक्रम तयार होत आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही नुकताच वनडेमध्ये सर्वात जलद ११ हजार धावा करण्याचा विक्रम केला. आता त्याने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचा सर्वात जलद २० हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम मोडला. त्याने जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर आपली २० हजारावी आंतरराष्ट्रीय धाव घेतली. सचिन आणि लाराने ४५३ डावात २० हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या. तर रिकी पॉटिंगने ४६८ डावात ही कामगिरी करत सर्वात जलद २० हजार आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला होता. विराटच्या आतापर्यंत ४१७ डावात (१३१ कसोटी, २२४ वनडे, ६२ टी-२० ) २० हजार धावा केल्या आहेत.
 
 
विराटने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यातच हा विक्रम मोडल्याने या विक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कारण भारताचा सचिन आणि वेस्ट इंडिजचा लारा या दोघांनीही तत्कालीन क्रिकेट जगतात आपला दबदबा निर्माण केला होता. त्यावेळी ते सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जात होते. या दोघांचा विक्रम एकाच सामन्यात तोही भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या सामन्यात सध्याचा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीने मोडला आहे.