हा द्वेष आहे की, भगव्याची भीती?

    दिनांक :28-Jun-2019
हा हिंदुत्वाचा द्वेष आहे, घृणा की मग भीती? संघाचा विचार नको, तो विचार मानणारी भाजपा सत्तेत नको. ते ज्याला मानतात त्या भगव्याचा तर लवलेशही नको कुठेच. अगदी क्रिकेटच्या खेळात मैदानात उतरणार्‍या खेळाडूंच्या अंगावरसुद्धा भगवा नको...! विचारांची लढाई चाललीय्‌ का तमाशा चाललाय्‌ हा? अंगावरच्या कपड्यांच्या रंगातही धर्म, हिंदुत्व शोधू लागलेत लोक आता या देशातले? राजकारणाची पातळी हीन स्तरावर नेऊन ठेवण्याची जणू स्पर्धा लागलीय्‌. त्या रंगावरून अकलेचे तारे तोडून राजकारणाचा डाव मांडण्याची चाललेली तयारी, हा त्याचाच भाग आहे. परवा राज्य विधानसभेच्या सभागृहात अबु आझमी ज्या तोर्‍यात बरळले, ज्या तर्‍हेने त्यांनी भगव्याविरुद्ध गरळ ओकली, तीही त्यांच्या भिकार राजकारणाची पद्धतच म्हटली पाहिजे.
 

 
 
खरंतर क्रिकेटची जागतिक पातळीवरील स्पर्धा अलीकडच्या काळात सुरू झाली. फुटबॉल, हॉकी, हॉलीबॉल आदी खेळात सहभागी होणार्‍या विविध देशांच्या संघासाठी वेगवेगळ्या रंगाचा गणवेश निश्चित करणे, ही त्या स्पर्धेच्या आयोजनाची स्वाभाविक प्रक्रिया आहे. यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपसाठीही त्या प्रक्रियेचा अवलंब झाला. प्रत्येक देशाला त्यांच्या संघातील खेळाडूंसाठी दोन वेगवेगळ्या रंगांचे गणवेश सादर करण्यास सांगण्यात आले. त्याचा प्राधान्यक्रम विचारण्यात आला. त्यानुसार गणवेशनिश्चितीही झाली. आता प्रश्न असा उपस्थित झाला की, एकाच दिवशी एकाच रंगाचे गणवेश असलेले दोन देश आमनेसामने उभे ठाकतील त्या दिवशी काय करायचे? उपाय सापडणार नाही इतकाही तो प्रश्न गहन नसल्याने त्यावरचा उपायही शोधला गेला. आयोजक देश म्हणून इंग्लंडला त्यांचा सध्याचाच गणवेश कायम ठेवण्याचा अधिकार प्रदान करीत, इतर देशांनी आपापल्या सादरीकरणातील दुसर्‍या प्राधान्यक्रमाचा गणवेश त्या एका सामन्यापुरता घालण्याचा सोपा पर्याय आयोजकांनी निवडला. एकाच रंगाचे गणवेश असलेल्या मोजक्या काही संघांबाबतचा हा प्रश्न सोडवायला डिझायनरला जितका वेळ लागला नाही, बीसीसीआयपासून तर आयसीसीआयपर्यंतच्या स्तरावर ज्याबाबत किंचितसाही किंतू निर्माण झाला नाही, त्याहून अधिक राजकारण तर आपल्या देशात नंतरच्या काळात सुरू झालेले दिसते आहे. दर्जाहीन राजकारणाच्या या अहमहमिकेत अबु आझमीच काय, अगदी कॉंग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनीही उड्या घेतलेल्या दिसताहेत.
जणूकाय केंद्रातल्या भाजपा सरकारनेच भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसाठीच्या या पर्यायी गणवेशाची निवड केली असल्याच्या थाटातला थयथयाट या राजकारण्यांनी आरंभला आहे. सरकार सर्वच बाबींचे भगवेकरण करीत असल्याचा आरोप बेछूटपणे करीत सुटले आहेत सारे. मुळात, या सर्वांचा तिळपापड होण्याचे कारण भारतीय क्रिकेट संघाच्या गणवेशातील त्या रंगात दडले आहे. कारण त्यातही हिंदुत्व दडले असल्याचा त्यांचा जावईशोध आहे. या गणवेशाच्या रंगाचे राजकारण करण्याची धडपड आणि त्यातून स्वत:च्या हिंदुद्वेषाचे जाहीर प्रकटीकरण करण्याचा हा उपद्‌व्याप हीच सध्याच्या भाजपाविरोधी राजकारणाची तर्‍हा झाली आहे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत अन्‌ बंगळुरूपासून तर हैदराबादपर्यंत इतके बॉम्बस्फोट झालेत गेल्या तीन दशकात. शेकडो नव्हे, हजारो लोक मृत्युमुखी पडले, धर्माच्या नावावर नंगानाच खेळला गेला, मृतदेहांचे खच पडले, रक्ताचा सडा पडला... हे स्फोट कुणी घडवलेत हेही सवार्र्ंसमोर उघड झाले. पण, त्या दहशतवादाचा रंग ‘हिरवा’ असल्याचे जाहीरपणे सांगण्याचे धाडस झाले नाही कधीच कुणालाच. त्या वेळी, दहशतवादाला धर्म नसतो, असा शहाणपणा शिकवायचे काही दीडशहाणे. पण, एक दिवस मालेगावातील एका मशिदीत बॉम्स्फोट काय झाला, हा दहशतवाद ‘भगवा’ असल्याचे सांगण्याची जणू शर्यत लागली. जो तो भगव्या दहशतवादाची चर्चा उच्चरवात करू लागला. तशी, दहशतवादाची चिंता वाहिली कुणी कधी इथे? त्यापूर्वी शेकडोंचे मुडदे पाडले गेल्याचीही खंत दिसली नाही कुणाच्याच चेहर्‍यावर कधी. कारण मरणारे लोक ‘आम’ होते. एकदिवस मशिदीत स्फोट झाला. एका विशिष्ट धर्माचे लोक त्यात मारले गेले, तेव्हा दातखिळी बसली सगळ्यांची. कालपर्यंत मूग गिळून गप्प बसलेल्या तमामजनांनी, यावेळी दहशतवादाचा रंग जाहीर करण्याची तर्‍हा का अवलंबविली असेल ठाऊक आहे? कारण, मुळात त्यांना राजकारणच हिंदुद्वेषाचे करायचे आहे. सत्तेची सूत्रं हाती राखण्यासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासोबतच हिंदूंचा जमेल तेवढा राग करण्याचे धोरण, हा दर्जाहीन राजकारणाच्या त्याच पद्धतीचा परिणाम आहे.
तरी बरं, भगवा हा काही काल परवा उदयाला आलेला रंग नाही. पूर्वापार परंपरेतून संत-महात्म्यांनी तो स्वीकारला. छत्रपती शिवरायांनी तो शिरोधार्ह मानला. अगदी कॉंग्रेस पक्षाच्या धुरीणांनीही राष्ट्रध्वजात भगव्याला सर्वात पाऽऽर वरचे स्थान दिले. पण, स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुत्व पायदळी तुडवण्याची रीत अनुसरली जाऊ लागली. नव्हे, तोच कॉंग्रेस आणि डाव्यांच्या राजकारणाचा पाया ठरला. सकल हिंदू समाज डोळे झाकून कॉंग्रेसच्या पाठीशी उभा होता, तरीही तो पक्ष अन्‌ त्याचे नेते हिंदूंनाच कस्पटासमान लेखत राहिले. कालौघात हिंदूंची ताकद दिवसागणिक वाढत गेली, त्या विचारांवर बेतलेली राजकीय व्यवस्था सत्तास्थानी आली, तसतशी या द्वेषाची तीव्रता अधिकाधिक गडद होत गेल्याचेच चित्र दुर्दैवाने सर्वदूर बघायला मिळते आहे. संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची कल्पना मांडणारा विचार चार-दोन लोकांना, त्यांच्या राजकीय गैरसोयीमुळे नकोय्‌ म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न झालेत, तरी त्या विचाराने दशदिशा भारून गेल्या आहेत. काळानुरूप त्याची स्वीकारार्हता वाढते आहे. केवळ भाजपा सत्तास्थानी विराजमान होण्यापुरते त्याचे परिणाम मर्यादित नाहीत. समाजजीवनाच्या विविध क्षेत्रातही त्याचे प्रकटीकरण होते आहे. अगदी राजकीय गरज म्हणून का असेना, पण कित्येक कॉंग्रेसजनांनी भाजपाची वाट धरणे असो, की मग योगाचा वैश्विक पातळीवर झालेला स्वीकार असो, या सार्‍या बाबीही त्याच प्रक्रियेचा परिपाक आहे. पण, हिंदुद्वेषाची बीजं इतकी खोलवर पेरल्यावर त्याचा विशाल वटवृक्ष व्हायचं तर सोडाच, पण ती धड अंकुरतदेखील नाहीयेत्‌ म्हटल्यावर, उलट काळ मागे पडतोय्‌ तशी त्याचीच प्रभा सर्वदूर विस्तारतेय्‌ म्हटल्यावर कॉंग्रेस, डाव्यांसहित सर्वांचाच पोटशूळ हा असा भगव्याच्या विरोधात उमळतोय्‌. खरंतर भारतीय क्रिकेट संघातील सदस्यांसाठी आयसीआयच्या डिझायनर्सनी जी जर्सी तयार करून दिली आहे त्यात सध्याच्या निळ्यासोबत नारंगी रंगाची जोड दिली आहे. म्हणजे तो रंग ‘ऑरेंज’ आहे. हे लोक सांगताहेत तसा तो ‘सॅफ्रॉन’ नाहीच मुळी. पण, नारंगी आणि भगव्यातला भेद बघत बसलं तर मग राजकारण कसे करता येईल? सरकारवर भगवेकरणाचा आरोप कसा करता येईल? मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात  उभे कसे करता येईल? त्यामुळे बेताल बरळत सुटले सारे भगव्याविरुद्ध. बरं, तो गणवेश भगवा असता, तरी त्यात एवढे अकांडतांडव करण्याजोगे काय आहे? पाकिस्तानचा गणवेश हिरवा आहे. बांगलादेशनेही स्वत:च्या धर्माचीच ओळख त्यांच्या गणवेशातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग भारताने भगवा रंग स्वीकारलाच तर त्यात गैर काय? यापूर्वीही क्रिकेटसहित विविध खेळांमध्ये त्या रंगाचा गणवेश घालून भारतीय खेळाडू मैदानात उतरले आहेत. तेव्हा त्यात आक्षेपार्ह वाटले नव्हते कुणालाच काही. तेव्हा तो रंग मान्य होता सगळ्यांना? की राजकारणाची पातळी इतकी खालच्या स्तराला पोहोचली नव्हती त्या वेळी? आता पोटशूळ एवढा टिपेला पोहोचलाच आहे, तर तिरंग्यात तरी भगवा ठेवायचा की नाही, तेवढं सांगा म्हणा दीडशहाण्यांनो!