शेल्फची सजावट

    दिनांक :28-Jun-2019
अवंतिका तामस्कर  
 
घराच्या सजावटीमध्ये शेल्फचाही वाटा मोठा असतो. तथापि, शेल्फ आपण कशा पद्धतीने सजवतो, यावर घराचा लूक बराचसा अवलंबून आहे. त्यासाठी शेल्फ सजवण्याची कला अवलंबली पाहिजे.
 
घरातील शेल्फ सजवणे ही एक कलाच आहे. या शेल्फमुळे खोलीची मुख्य भिंत व्यापलेली असते. यावर ठेवलेल्या वस्तूंमधून गृहिणीचे आणि त्याचप्रमाणे घरातील इतर व्यक्तींचेही व्यक्तिमत्त्व उमटत असते. त्यांच्या आवडी-निवडी, व्यवस्थितपणा, स्वच्छता, कलात्मकता अशा बर्‍याच गोष्टींची छाप शेल्फच्या सजावटीतून उमटत असते. म्हणूनच शेल्फ सजवताना ती विचारपूर्वक सजवावी. शेल्फमध्ये नेमके काय ठेवावे आणि ती कशी सजवावी हे समजत नसेल, तर सर्वात पहिला विचार करा की, तुम्हाला कुठली वस्तू सर्वाधिक आवडते. आपले छंद आणि आवड लक्षात ठेवून काही वस्तू येथे सजावटीसाठी ठेवाव्यात. मुलांनी बनवलेल्या वस्तू, पुस्तके, डेकोरेटिव्ह प्लेटस्‌, फोटोफ्रेम, शोपीस यांसारख्या वस्तू शेल्फमध्ये ठेवता येऊ शकतात.
 

 
 
या वस्तू एकत्र करून गटागटानेही ठेवता येऊ शकतात. पांढर्‍या रंगाच्या वस्तू एकत्र ठेवाव्यात किंवा समुद्र ही थीम बनवून शिंपले, मोती, वाळूचे पेंटिंग, निळ्या रंगाची फोटोफ्रेम इत्यादी वस्तू थीमनुसार शेल्फमध्ये सजवता येऊ शकतात. फॅमिली फोटोदेखील शेल्फमध्ये ठेवता येऊ शकतो. हे कॉम्बिनेशनदेखील फार आकर्षक दिसते. एखाद्याला बटन जमवण्याचा, तर एखाद्याला शिल्प जमवण्याचा छंद असू शकतो. वेगवेगळी आकर्षक क्रॉकरीही एखाद्या महिलेची आवड असू शकते. या वस्तू शेल्फमध्ये सुरेख पद्धतीने सजवता येऊ शकतात. वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू येथे मांडून पाहुण्यांची कौतुकाची थापही मिळवता येऊ शकते. फक्त लहान िंकवा मोठ्या वस्तूंनीही शेल्फ सजवता येते. आकर्षक फ्रेम, मोठ्या फुलांचा गुच्छ यांसारख्या वस्तूंना शेल्फमध्ये जागा देऊन आपल्या घरातील हा भाग नक्कीच वेगळ्या रूपात सजवू शकाल.
 
विविध विषयांच्या, लेखकांच्या पुस्तकांनी सेल्फचा एक कोपरा सजवून आपली पुस्तकांबद्दलची आवड प्रदर्शित करू शकता. पॉटरी आणि पुस्तकांचे हे कॉम्बिनेशन येणार्‍या पाहुण्यांसमोर तुमची वेगळी छाप पाडू शकते. पॉटरीमध्ये वेगवेळ्या आकाराचे पॉट सुरेख पद्धतीने मांडता येऊ शकतात. चिनी मातीचे, पेंटिंग केलेले, कोरीव काम केलेले, सिरॅमिक वर्क केलेले असे कितीतरी प्रकार येथे मांडता येऊ शकतात.
 
मॅचिंग सेटच्या वस्तू सजवण्याऐवजी असमान रचनाही करू शकता. मध्यभागी एखादी वस्तू ठेवण्याऐवजी एका बाजूला ती ठेवू शकता. तसेच विषम संख्यादेखील खूप कुतूहल वाढवणारी ठरू शकते. तीन, पाच, सात अशा संख्येत वस्तू सजवाव्यात. सम संख्येत वस्तू ठेवायच्या असतील, तर तिरक्या म्हणजेच डायगोनली ठेवाव्यात.
 
शेल्फ खरेदी करताना काही नियम लक्षात ठेवावेत. एकाच आकाराचे शेल्फ कधीही खरेदी करू नयेत. कारण वेगवेगळ्या आकाराचे शेल्फ खोलीला असमान लूक देतात. यामुळे खोली कंटाळवाणी नाही तर अधिक उत्साह देणारी वाटते. एकाच खोलीत दोन-तीन वेगवेळ्या आकारातील शेल्फ ठेवणेही चांगले दिसते. शेल्फ सजवण्यासाठी आणखीही काही पयार्यांचा विचार करता येऊ शकतो. शेल्फवर मध्यभागी एखादी वस्तू सेंटर फॉर अॅट्रॅक्शन म्हणून ठेवता येऊ शकते. शेल्फच्या दोन्ही बाजूंनी पुस्तके ठेवावीत आणि मध्यभागी एखादा सुंदर कॅण्डल स्टँड, शोपीस यापैकी काहीही ठेवता येईल.
 
ग्लास, क्रिस्टल आणि सिल्व्हर वस्तू शेल्फमध्ये चमकदार दिसतात. आवड असेल तर शेल्फच्या मागच्या बाजूने मोठा आरसाही ठेवता येऊ शकतो. यामुळे शेल्फचा इफेक्टही वाढतो. चमकदार, चकचकीत क्रॉकरी सेटही सजावटीसाठी उत्तम पर्याय आहे. शेल्फवर लेअर बनवणेदेखील एक कला आहे. उभे ट्रे, आकर्षक प्लेटस्‌ आणि आर्ट पीस हे बॅकड्रॉपमध्ये ठेवता येऊ शकतात. त्यांच्यासमोर त्यांच्यापेक्षा लहान आकाराच्या वस्तू ठेवाव्यात. यामुळे असमान सुंदरता अधिक आकर्षक स्वरूपात दिसू लागते.