स्टार्कची स्टार कामगिरी

    दिनांक :28-Jun-2019
थर्ड ओपिनियन..
मिलिंद महाजन 
विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघ यंदाही आपले जेतेपद कायम राखण्याचे ध्येय उराशी ठेवून इंग्लंडच्या भूमीवर उतरले आहे. कर्णधार ॲरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथसारखे दमदार फलंदाज आणि मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जेपी बेहरनडॉर्फसारखे प्रभावी गोलंदाज आपली जबाबदारी नेटाने बजावून आपल्या संघाला विजतेपदाच्या शर्यतीत सर्वातसमोर आणून ठेवले. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात आतापर्यंत सात पैकी सहा सामने जिंकले, केवळ विजेतेपदाचा प्रबळ दावेदारापैकी एक असलेल्या भारतीय संघापुढे त्यांची डाळ शिजली नाही. एक मात्र खरे की ऑस्ट्रेलियाने सहा विजयासह स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान सुनिश्चित केलेले आहे.  
 
गत मंगळवारी ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडवर मात केली आणि गुणतालिकेत न्यूझीलंडला खाली खेचून अव्वल स्थान मिळविले. विश्वचषकात सर्वाधिक बळी टिपणार्‍या गोलंदाजांच्या यादीतही मिचेल स्टार्कने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला खाली खेचून स्वतः आघाडीचे स्थान मिळविले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टार्कने तब्बल चार बळी टिपले. त्याने जो रूट, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स व आदिल रशिदसारख्या खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परत पाठविले.
 
या चार बळींसह मिचेल स्टार्कने विश्वचषकात सर्वाधिक 19 बळींची नोंद केली आहे. गुणतालिकेत स्टार्क पाठोपाठ पाकिस्तानचा मोहम्मद आमीरने सोळा बळींसह दुसरे स्थान मिळविले आहे. जोफ्रा आर्चर 16 बळींसह तिसर्‍या स्थानावर फेकला गेला. न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन (15) व इंग्लंडचा मार्क वूड (13) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहे. स्टार्कने सात सामन्यात 64.4 षटकात 347 धावांच्या मोबदल्यात 19 फलंदाजांना बाद केले. यात त्याच्या 4 निर्धाव षटकांचाही समावेश आहे.
 
विश्वचषकाच्या बाद फेरीसाठी आपल्या संघाची पूर्णपणे तयारी झाली आहे, असा आत्मविश्वास स्टार्कला आहे, परंतु त्याचबरोबर त्याने आपल्या सवंगड्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. आपण अव्वल स्थानी असलो तरी प्रशंसेने हुरळून जाऊ नका. अजून आपल्याला क्रिकेटची पंढरी लॉर्डस्‌वर खेळायचे आहे. त्यामुळे लॉर्डस्‌वर खेळण्यासाठी तुम्हाला अधिक उत्कृष्ट प्रदर्शन करायचे आहे. शनिवारी विजेतेपदाचा आणखी एक दावेदार असलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध सामना खेळायचा असून हा सामना कठीण आहे. या सामन्यावर आपले लक्ष केंद्रित करा, असे मिचेल स्टार्कने आपल्या ऑस्ट्रेलियन सवंगड्यांना म्हटलेले आहे.