वैज्ञानिक डॉ. गगनदीप कंग

    दिनांक :28-Jun-2019
निलेश जठार 
 
विज्ञानामधील माझं योगदान खरं म्हणजे माझ्या टीमचं असून त्याचं चीज झाल्याचं समाधान सर्वांत जास्त आहे.’’ असं अगदी सुरुवातीलाच स्पष्टपणे सांगणार्‍या डॉ. गगनदीप कंग या सध्या ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, फरिदाबादच्या कार्यकारी संचालक आहेत. 370 वर्षांच्या इतिहासात रॉयल सोसायटी लंडनद्वारे फेलो म्हणून निवडलेल्या त्या पहिल्या हिंदुस्थानी महिला वैज्ञानिक आहेत.
 
300 पेक्षा जास्त वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित झालेल्या डॉ. गगनदीप कंग यांचं मुख्य कार्य मुलांमधील डायरियाबाबतच्या संसर्गाविषयी असून, ते ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमसी) वेल्लोर या ठिकाणी पार पडलेलं आहे. आपल्या यशाचं श्रेय त्या आपल्या टीमला देतानाच पुढे म्हणाल्या, ‘‘गेली दोन दशकं खरंतर त्याहून जास्त काळ आम्ही आमच्या सहकारी संस्था आणि भागीदारांबरोबर जे कार्य संपूर्ण हिंदुस्थानच्या क्षेत्रात केले त्याची ही पावती आहे. रॉयल सोसायटीनं हिंदुस्थानच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामधील आमच्या कार्याची नोंद घेतली, ही खूपच चांगली बाब आहे. एक स्त्री म्हणून विज्ञानक्षेत्रात काम करण्याचे खूप फायदे आहेत. 

 
 
एकतर आपण एकाच वेळी वेगवेगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याही जलद. कारण आपल्याला एकाच वेळी वेगवेगळ्या जबाबदार्‍या वेगवेगळ्या भूमिकांतून निभवायच्या असतात. मी माझ्या आईकडून बरंच काही शिकले. कशाप्रकारे विशिष्ट गोष्टी हाताळायच्या तेदेखील तिने तिच्या संपूर्ण आयुष्यात तिच्यावर पडलेल्या सर्व बाबी एक संधी म्हणून तिच्या खास पद्धतीने निभावल्या. एका पितृसत्ताक समाजात स्त्री नसणं हे तितकंच वाईटदेखील आहे. या ठिकाणी महिलांच्या व्यावसायिक आणि सामाजिक योगदानाची पुरेशी दखल घेतली जात नाही. याचा विचार करता मला माझ्या स्त्री असल्यामुळे जे काही विलंब आणि अडथळे पार करावे लागले त्यामुळे माझं संशोधन यापेक्षा पाच-सहा वर्षे आधीच आताच्या पातळीवर असतं. 30 वर्षांच्या करीअरमध्ये हा तसा लक्षणीय कालावधी आहे.’’
 
इन्फोसिस लाईफ सायन्सेस पुरस्कारप्राप्त डॉ. गगनदीप कंग यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यावर, समाजाशी थेट संबंध असलेल्या आरोग्यविषयक बाबींवर संशोधनास सुरुवात केली. याबाबत त्यांना प्रोत्साहन कुठे लाभलं या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘‘सर्व गोष्टींमध्ये असलेल्या चांगुलपणावर माझी श्रद्धा आहे. समाजामध्ये तुमचं पद वा स्थान काय आहे? यावर तुम्हाला काय मिळायला हवं हे ठरणं योग्य नाही. मी मुलांतील डायरियाबाबत संशोधन करते. हे एक संपूर्णपणे दुर्लक्षित क्षेत्र आहे. जेव्हा डॉक्टर्स संशोधन करण्याचा विचार करतात तेव्हा प्रामुख्यानं ते ग्लॅमरस क्षेत्राकडे म्हणजे न्यूरोसायन्स, कॅन्सर, एचआयव्ही इ. विषयांकडे वळतात. डायरिया आणि न्यूमोनिया हे गरीब मुलांचे रोग आहेत. श्रीमंत लोक यामुळे मृत्यू पावत नाहीत. त्यामुळे मी विचार केला की, हे एक असं क्षेत्र आहे की त्याचं मूल्य संपूर्ण समाजाच्या दृष्टीनं खूपच असून वैद्यकीय क्षेत्रालाही ते मान्य आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम केल्याने समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी लसी, शुद्ध सुरक्षित पाणी, मलनि:सारण आणि पोषण याबाबतच्या इंटरव्हेन्शन्सद्वारे सर्वाधिक गरज असलेल्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो. हे मी प्रामुख्यानं ठरवलं.’’
 
पोटातील जंतांविषयीचा अभ्यास करणार्‍या सीएमसी वेल्लोरच्या गटांचं त्यांनी नेतृत्व करून हिंदुस्थानातील मुलांमधील जंत दूर करणार्‍या डिवॉर्मिंग कार्यक्रमाविषयी महत्त्वपूर्ण काम केलं. शौचालयाच्या अभावामुळे पोटाचे बरेच विकार बळावतात, हे त्यांनी वारंवार सिद्ध करून दाखवलंय. लहान मुलांना त्याचा सर्वाधिक फटका बसतो, हे त्यांनी हूकवर्मसारख्या पायांद्वारे शरीरात प्रवेश करणार्‍या जंतांविषयी संशोधनकार्यातून दाखवून दिलंय. हिंदुस्थानसारख्या देशात प्रदूषित अन्न, पाणी, वैयक्तिक स्वच्छता आणि मलनि:सारण यांसारख्या प्रमुख जोखिमा असलेल्या देशात पोटाचे संसर्ग विशेषतः मुलांमधील संसर्ग कमी करता येणं शक्य आहे का? हा प्रश्न आपल्याला भेडसावतो.
 
डॉ. गगनदीप कंग याविषयी सांगतात, ‘‘खरंतर आपल्यापुढे दोन पर्याय आहेत, एक म्हणजे काहीतरी प्रयत्न करून आपण रोगाला अटकाव करू शकत नाही हे मान्य करणं आणि दुसरा म्हणजे काहीही न करणे. त्यामुळे समस्यांवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न उपलब्ध टुल्सचा वापर करीत सुरू ठेवणं आणि भविष्यात या संसर्गजन्य रोगावर मात करण्याचे काही नवे मार्ग सुचतील यावर लक्ष ठेवणे, त्यातल्या त्यात योग्य मार्ग आहे. मुलांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होण्याबरोबरच योग्य वाढ व्हावी यासाठी पोषण महत्त्वाचं. त्यामुळे पोटांचे विकार आणि उपाय याला मदतच होईल.’’
 
मुलांमधील संसर्गाबाबत आंतरशाखीय संशोधनासाठी डॉ. कंग सुपरिचित आहेत. रोटाव्हायरस हा त्यांच्या खास संशोधन आवडीचा विषय. त्या सार्वजनिक आरोग्याबाबत कामे करीतच असतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सल्लागार समित्यांवर काम केलंय, करीत आहेत. 2015 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक लसीकरण तांत्रिक सल्लागाराच्या अध्यक्षा म्हणूनही त्या काम करीत आहेत. युवतींनी शास्त्रीय क्षेत्रात संशोधन करण्यासाठी पुढे यायला हवं. याबाबत त्या म्हणतात, ‘‘एक तर चौकसपणा हवा. शिवाय ज्या क्षेत्रात काम करायचंय त्याबाबत पॅशन असणं महत्त्वाचं. मग प्रयत्न अविरतपणे हवेत. विज्ञानामध्ये बर्‍याचदा अपयश पदरी पडतं. तेव्हा हार मानता कामा नये. वारंवार अपयश येऊनदेखील तुम्ही काम करायलाच हवं. कारण तुम्हाला सतत काहीतरी नवं गवसत राहतं आणि तेच महत्त्वाचं आहे. अशा या पहिल्या हिंदुस्थानी स्त्री वैज्ञानिक एफआरएस.