‘‘यस, आय कॅन!’’

    दिनांक :28-Jun-2019
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. सुटी संपवून मुले शाळेला जाऊ लागली आहेत. मात्र, अगदी पहिल्या दिवसापासून मुलांवर- अगदी माध्यमिक वर्गातीलही मुलांवर-अभ्यासाचा ताण दिसून येतो. आजकाल स्पर्धेच्या या युगात मुलांवर अपेक्षांचं ओझं लादलं जातं, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा केली जाते. कोवळी मुलं हा ताण सहन करू शकत नाहीत. गरज आहे मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याची, त्यांना समजून घेण्याची. त्यांच्या भल्यासाठी जरूर रागवा, पण तेवढेच प्रेमही केले पाहिजे. त्यांच्यावर योग्य ते संस्कार केले पाहिजेत. 

 
 
आधुनिक स्पर्धेच्या युगात लहान मुलांवर योग्य वेळी सुसंस्कार झाले, तर उद्याचा भारत महासत्ता होण्याचे, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार होऊ शकेल. शिक्षणाचे महत्त्व आजकाल बदलत चालले आहे. तांत्रिक ज्ञानाला प्रमाणाबाहेर महत्त्व येत आहे. त्यातील नैतिकता कमी होत चालली आहे. नैतिकतेवाचून तर सारे व्यर्थ आहे. महात्मा गांधींनी म्हटले होते, शिक्षणाला नैतिक मूल्यांची जोड नसेल तर ते अधःपतनास कारणीभूत ठरते. त्याचा प्रत्यय आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये येत आहे.
 
मुले ही देवाघरची फुले, असे साने गुरुजींनी म्हटले होते. आपण मुलांना फुले म्हणतो, पण या फुलांना नेहमी सकारात्मक विचारसरणी व आदर्श दिला पाहिजे. आजची मुले ही उद्याची फुले, उद्याच्या उज्ज्वल भारताचे आधारस्तंभ, सबल व सशक्त होण्यासाठी प्रत्येक पालकांनी जागरूक राहायला पाहिजे.
 
असे सांगतात की, जगाला पुरेल एवढं मनुष्यबळ आज आपल्या भारतात आहे! एका अभ्यासामध्ये हे स्पष्ट झाले, की सर्वांत तरुण देश भारत आहे. या अर्थाने की, जवळजवळ 70 टक्के लोकसंख्या युवा आहे. युुवक व युवतींनी भरलेला देश आपला आहे. काहीही करण्याची ताकद आज आपल्याकडे आहे. प्रश्न आहे तो समजावून घेण्याचा व देण्याचा. युवकांना योग्य दिशा व अचूक मार्गदर्शन यांच्या बळावर ब्रिटिशांप्रमाणे आपणही खर्‍या अर्थाने जगज्जेते होऊ शकतो.
 
‘‘यू कॅन विन!’’ व्यवस्थापनशास्त्रतज्ज्ञ शिव खेरा सांगतात. त्या धर्तीवर युवकांनो, ‘‘यस, आय कॅन!’’ असे आत्मविश्वासाने म्हणत पाऊल पुढे टाकले पाहिजे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हा मंत्र मीच घडवणार माझे जीवन, असे म्हणत आत्मसात केला पाहिजे. हाच मंत्र मनात घेऊन प्रत्येक युवकाने जिज्ञासा वाढवून खर्‍या अर्थाने जागे झाले पाहिजे. माणसे घडत नसतात, घडवावी लागतात. आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. त्यासाठी शरीर व मनाच्या सबलतेकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. रोज व्यायाम केला पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, माझ्या प्रिय मित्रांनो, रोज मैदानावर जा, खेळ खेळा, वासरासारखे हुंदडा, व्यायाम करा, जेव्हा तुम्ही सबल व सशक्त व्हाल, तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे कळू शकेल. म्हणून आपलं शरीर कमावण्यासाठी रोज व्यायाम करणं आवश्यक आहे. पण, आजकाल मैदाने रिकामी दिसतात. मुले, युवावर्ग मोबाईलमध्ये अडकलेला दिसतो. यातून मार्ग काढला पाहिजे.
 
अब्राहम लिंकनने आपल्या मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात मुलाला समाजात कसे वागायचे व विषम परिस्थितीत कसे जगावे, हे शिकवण्याची विनंती केली होती. याच सामाजिक शिक्षणाची आज आपल्या मुलांना गरज आहे. आपण आपल्या मुलांवर नुसते अपेक्षांचे ओझे लादतो. बिचारी मुले पार थकून जातात. त्यातून ती चुकीचा मार्ग पत्करतात. चित्रपटांवर आत्महत्येचे खापर फोडून पालकवर्ग मोकळा होतो. तीन तासांत सिनेमा आपल्या मुलांच्या भावनांना हात घालतो, मग जन्मापासून आपल्याबरोबर असणार्‍या स्वतःच्या मुलांच्या भावना आपण का ओळखू शकत नाही, हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारला पाहिजे.