महाविद्यालयीन तरुण आणि समाजहित...

    दिनांक :28-Jun-2019
प्रा. रूपाली के. मानकर
7972565769 
 
परवा सकाळी एका मैदानाजवळून जात होते, तर एक दृश्य दिसलं- काही महाविद्यालयीन तरुण-तरुणी आपल्या प्राध्यापकांसोबत कडुिंनबाच्या झाडाचे वृक्षारोपण करीत होते. त्यापैकी एका विद्यार्थ्याने समोर येऊन वृक्षारोपण केलेल्या रोपट्याला मैत्रीबंध अर्थात फ्रेंडशिप बॅण्ड बांधले आणि तिथे उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून त्याच्या कृत्याचे स्वागत केले. हे दृश्य पाहून मलाही त्या विद्यार्थ्याचे कौतुक करविल्याविणा राहवले नाही. 

 
 
मी सहजच त्या विद्यार्थ्याला विचारले, हे कृत्य तुला का करावेसे वाटले? त्याचे उत्तर ऐकून भूतदयेच्या भावनेने माझ्याही मनात घर केले. तो विद्यार्थी म्हणाला, ‘‘मॅडम, मैत्रीचा भाव हा सर्वश्रेष्ठ आहे आणि हा भाव सहजासहजी कुणाहीप्रती उद्भवत नाही. वृक्ष हे आपले सोबती ना, मग वृक्षाशी मैत्री करून मी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो आणि पर्यावरणपोषक वृक्ष समाजाला बरंच काही प्रदान करतो, मग त्याचं संवर्धन करणं माझं कर्तव्य आहे आणि मैत्रीच्या नात्यातून हे शक्य होऊ शकतं म्हणून मी वृक्षाशी मैत्री करायचं ठरवलं.’’
 
महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी असा विचार करून कृती करतो, हे पाहून माझे मन धन्य झाले आणि यापुढे आपण स्वत: त्याच्या कार्याला पाठिंबा द्यायचा, हे मनोमन मी ठरवून गेले.
 
महाविद्यालय हे असं ठिकाण आहे, जिथं 18 ते 22 वर्षं वयाच्या व्यक्तींचा समूह आपलं आयुष्य घडवत असतो. हल्लीचा तरुण हा फक्त भोगविलासाच्या कल्पना रंगवतो व त्या दिशेनेच प्रयत्न करतो, असं म्हणणार्‍या घटकाला मी पाहिलेली घटना उत्तर आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. असं म्हणतात, शिक्षणाने मानव समृद्ध होतो. शैक्षणिक दिवसांमध्ये सामाजिक आशयाचे होणारे संस्कार पुढे कृतीत आणण्याच्या दृष्टीने होणारे प्रयत्न येत्या पिढीला सशक्त बनविण्यासाठी उपयुक्त असतात/ठरतात.
 
कला-वाणिज्य शाखेबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या बर्‍याच पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षण घेत असतात. विज्ञानातील वेगवेगळ्या प्रयोगातून समाज आधुनिक व्हावा तसेच अनेक सोयी-सुविधा समाजात निर्माण व्हाव्या यासाठी तंत्रज्ञान शिक्षणाचा अवलंब केला जातो.
 
कॉलेजमध्ये प्रवेश घेणे आणि भविष्यात सेट होण्याच्या कल्पना रंगवत त्या सत्यात उतरविण्याच्या दृष्टीने विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनापासून जी धडपड करतात त्याचप्रकारे आपण समाजाचं देणं लागतो, ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाच्या विकासासाठी आपण कृतिशील असलो पाहिजे, या भावनेचा दीप विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून मनात तेवत ठेवण्याची सदैव गरज आहे. पदवी िंकवा पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाला प्रोजेक्ट सुपूर्द करावा लागतो. अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, शेतीशास्त्र, शिक्षणशास्त्र या शाखेच्या शिक्षणातील बहुतांश प्रोजेक्टचा उपयोग समाजाच्या विकासासाठी होऊ शकतो.
 
शेती करण्यासाठी काही यंत्राचा तांत्रिक पद्धतीने उपयोग होतो व त्याचं शिक्षण हे कृषी शाखेच्या पदव्यांमध्ये मिळतं. नुसतं कृषी पदवी घेऊन पोट भरण्याच्या दृष्टीने नोकरी मिळविण्यापुरतं विद्यार्थ्यांनी मर्यादिन न राहता, आपल्या ज्ञानाचा उपयोग भारतातील शेती व्यवसायासाठी करण्याचा निर्धार करून विद्यार्थी सतत कृतिशील राहिले, तर शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू असणार्‍या आपल्या राज्यात शेती करणारी सशक्त पिढी निर्माण करण्यात भारतीय समाज यशस्वी होईल.
 
आरोग्य विज्ञान शाखेत जे विद्यार्थी शिक्षण घेतात, मग ते मानवी आरोग्यविज्ञान असो वा प्राणी आरोग्य विज्ञान असो, शिक्षणासोबतच सामाजिक आरोग्य जपता यावे म्हणून छोटे- छोटे प्रकल्प प्रत्यक्षात उतरविले, तर महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक आरोग्य जपता यावे यादृष्टीने तसेच आरोग्याविषयी समाजात जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीने हातभार लागू शकतो.
 
संगीतामुळे माणसाचे मन प्रसन्न होते तसेच ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी संगीताची मदत होते. कला शाखेत विशेषत: संगीत शाखेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी काही कार्यक्रम वृद्धाश्रमात आश्रय घेत असणार्‍या वृद्धांसाठी केले, तर त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण होऊ शकतो. संगीताने लहान मुले, नोकरदार, व्यावसायिक, विविध आजारावर उपचार घेत असलेले रुग्ण यांच्या आयुष्यात चैतन्य निर्माण होण्यास मदत होते.
 
त्याचबरोबर जे विद्यार्थी अध्यापनशास्त्राचं शिक्षण घेतात, त्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असल्यापासून समाजातील गरजूंना तसेच जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला, तर शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकेल, यात मात्र शंका नाही. कारण शिक्षण हे असं माध्यम आहे की, ज्याने मनुष्याचा बौद्धिक, नैतिक विकास होतो.
 
महाविद्यालयीन जीवनानंतर विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासोबतच समाजात जबाबदार व्यक्ती म्हणून वावरू लागतो तेव्हा महाविद्यालयापासूनच समाजासाठी झटण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होत राहिली, तर भारतात सुदृढ, सुजाण, सशक्त समाजाचं चित्र वर्षानुवर्षे पाहावयास मिळत राहील आणि येणारा काळ साक्षीदार राहील, हा विचार करून पाहताना मी फार सुखावत आहे.