पद्मावती वसंत करंदीकर

    दिनांक :28-Jun-2019
स्नेहल दीक्षित
 
आणि सीतेला पुन्हा अग्निपरीक्षेला उभे राहावे लागले. मात्र, यावेळी सत्ययुग नव्हतं आणि पोटात गिळून घ्यायला धरणी येणार नव्हती. कलियुगातील या अग्निकुंडातून कुणाला जिजाऊ बनून बाहेर यायचं होतं आणि घराचा, देशाचा, समाजाचा कणा बनायचं होतं. मात्र, यातना होत्या यमुनाबाई सावरकरांच्या...
 
कुणाचे वडील, कुणाचे पती, कुणाचे भाऊ, पुत्र, तर काही घरातील सर्व कर्ते पुरुषच तुरुंगात. अशा वेळी वडील आणि भाऊ दोघेही तुरुंगात असलेल्या माझ्या घरात, माझ्या पंखांत बळ आणि मनात आत्मविश्वास आला तो खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माझ्या आईमुळे, काहीही झाले तरी शिक्षण सोडायचे नाही, असा निरोप तुरुंगातून पाठवणार्‍या भावामुळे आणि सतत काहीतरी चांगलं करत राहायचं, समाजाला देत राहायचं या भावनेतून 1000 सूर्यनमस्कार तुरुंगातसुद्धा घालणार्‍या वडिलांमुळे.
 
आणि या सर्वांचाच परिणाम म्हणून की काय मोठा भाऊ (यशवंत करंदीकर) या वयातसुद्धा अनेक सामाजिक संस्थांची, कोणत्याही मानाची वा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अत्यंत निरपेक्ष भावनेने कामे करतो. दुसर्‍या भावानेसुद्धा आणिबाणीनंतर शिक्षण झाल्यावर पूर्णवेळ समाजसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतलं (प्रमोद करंदीकर). मोठ्या भावाची काळाच्या पुढचा विचार करायची वृत्ती थक्क करून जाते. अभिमानाची गोष्ट म्हणजे वहिनी (रंजना प्रमोद करंदीकर)सुद्धा पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ती आहे.
 
26 जून 1975 ची ती सकाळ. वडील (वसंतराव करंदीकर) गाईचं चारापाणी करत होते, आई स्वयंपाकाची तयारी, तर आम्ही भावंडे आपापली वाटून दिलेली कामं. आणि अचानक प्रताप मिलच्या गेटवरून निरोप आला, आप्पांना बोलावले आहे. मिलच्या कामासाठी अनेकदा गेटवर जावे लागे म्हणून वडील घरातील कपड्यांनिशी गेले. बर्‍याच वेळानंतर घरी कळले, आणिबाणीच्या धरपकडीत वडिलांना पोलिसांनी नेले.
 
चार भाऊ, तीन बहिणी, आई-वडील असे आमचे कुटुंब. घरी गाई-वासरं असल्यामुळे खाण्याची आबाळ कधीच झाली नाही. मात्र, चारापाणी, आमचे शिक्षण याचा प्रश्न होताच. खूप कष्टात दिवस काढावे लागत असतानाही
‘ठेविले अनंते तैसेचि राहावे
चित्ती असू द्यावे समाधान...’
या बाण्यावर चालणारी आमची आई, सतत आनंदी चेहरा ठेवून सर्व प्रसंगांना सामोरे गेली. याच प्रत्यक्ष वागणुकीतून दिलेल्या शिकवणीमुळे आम्ही भावंडे दूध-भाकरीमध्ये समाधानी राहायला शिकलो. मला आठवते, दोघी बहिणी मिळून एकच सायकल होती. कधी पायी, तर कधी डबलसीट कॉलेजला जावे लागे. मैत्रिणी कॉलेजसाठी बोलवायला यायच्या तेव्हा आम्ही कधी गोवर्‍या थापत असायचो, कधी भांडी धुणे, तर कधी पाणी भरणे. मात्र, लाज, कमीपणा कोणत्याच कामाचा वाटला नाही.
 
मोठा भाऊ धुळ्याला, तर वडिलांना नाशिकच्या तुरुंगात ठेवलं होतं. कधीतरी परवानगी घेऊन भेटता यायचं.
मात्र, अशा परिस्थितीत तुरुंगाबाहेर असणारे संघाचे लोक अधूनमधून विचारपूस करायला, मदत करायला यायचे, तेव्हा संघ पाठीशी असल्याचं समाधान वाटायचं. शेवटी कवी अनिलांच्या भावपूर्ण ओळी आठवतात-
‘कसे निभावून गेलो
कळत नाही, कळले नव्हते,
तसे काही जवळ नव्हते,
नुस्ते हाती हात होते...’