कान्हेरे बिग बॉसमधून बाहेर

    दिनांक :28-Jun-2019
मुंबई,
मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. अभिजीत बिचुकलेच्या अटक नाट्यानंतर आता बिग बॉसच्या चाहत्यांना अजून एक धक्का बसला आहे. बिग बॉसमधील स्पर्धक पराग कान्हेरे याला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नेहा शितोळे हिच्यासोबत केलेल्या गैरवर्तनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
पराग कान्हेरे बिग बॉसच्या घरामधील पहिल्या दिवसापासून विविध कारणांमुळे चर्चेत होता. पराग हा शेफ आहे. त्यामुळे तो कधी त्याच्या जेवणामुळे, तर कधी रुपालीसोबतच्या रोमान्समुळे चर्चेत राहिला. परंतु त्याला अचानक बिग बॉसने घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
बिग बॉसने स्पर्धकांना 'टिकेल ते टिकेल हा टास्क दिला आहे. या टास्कदरम्यान परागने रागाच्या भरात नेहाच्या कानशीलात लगावली. तसेच तिच्यासोबत गैरवर्तनही केले. त्यामुळे शिवानी सुर्वेप्रमाणे बिग बॉसने परागलाही घराबाहेर हाकललं आहे.
यावेळी मराठी बिग बॉसमध्ये नॉमिनेशनपेक्षा इतर कारणांमुळे जास्त स्पर्धक घराबाहेर पडत आहेत. सुरुवातीला शिवानी सुर्वेला तिच्या वागणुकीमुळे आणि तब्येतीच्या कारणांमुळे घराबाहेर जावे लागले. त्यानंतर अभिजीत बिचुकलेला अटक झाल्यामुळे त्याला घराबाहेर पडावे लागले, आणि आता पराग कान्हेरेची हकालपट्टी करण्यात आली आहे.