लातुरमध्ये पेरण्यांना सुरुवात

    दिनांक :28-Jun-2019
लातूर:  राज्यात मन्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. लातूर, अहमदपूर, चाकूर, उदगीर या भागात शेतकऱ्यांनीही पेरण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. एकूण क्षेत्रफळापैकी फक्त ०२ टक्के पेरण्या अद्याप झाल्या आहेत. त्यामुळे बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली असून लातूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

 
 
 
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात यावर्षीही दुष्काळाच होता. तीन दिवसापूर्वी मान्सूनच्या पावसाने लातूर जिल्ह्यात हजेरी लावली. कुठे कमी तर कुठे जास्त असा हा पाऊस बरसला. तर अनेक ठिकाणी अद्याप पाऊसच पडलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या फक्त ७१ मिमी इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पावसाने १०० मिमीची सरासरी ओलांडलेली नाही. अगोदरच दुष्काळ त्यात रब्बीच्या पेरण्याही शेतकऱ्यांनी केलेल्या नव्हत्या. त्यामुळे ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे तेथील काही शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. ज्यात लातूर, अहमदपूर, देवणी, चाकूर, उदगीर, अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. जमिनीत ओल चांगली असल्यामुळे सोयाबीन पेरणीला सुरुवात केल्याचे लातूर तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी सांगत आहेत.
जिल्ह्यात अद्यापर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे बहुतांश भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जोपर्यंत जमिनीत चांगली ओल निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केलं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ०२ टक्के भागातच पेरण्या झाल्या आहेत. ज्या ठिकाणी पेरण्या सुरु आहेत तेथील शेतकऱ्यांनी आंतर पिकात पेरा करण्याचे आवाहन कृषी विभागाने केलं आहे.