स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात पहिला

    दिनांक :28-Jun-2019
मुंबई : केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने 16 जानेवारी 2016 पासून देशभरात ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. एकूण 19 कृती आराखड्यानुसार सुरु असलेल्या या कार्यक्रमावर देखरेख ठेवणाऱ्या केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) 24 जून रोजी राज्यनिहाय स्टार्टअप उद्योगांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशातील 29 राज्ये आणि 7 केंद्र शासीत प्रदेशांची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. या यादीत महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक 2 हजार 847, दिल्ली 2 हजार 552, उत्तरप्रदेश 1 हजार 566 तर 1 हजार 80 स्टार्टअपसह तेलंगण पाचव्या स्थानावर आहे.

 
 
 
लघु उद्योग विकास बँकेने भांडवली बाजारावर देखरेख ठेवणाऱ्या ‘सेबी’ संस्थेकडे नोदंणीकृत संस्थांच्या माध्यमातून स्टार्टअप उद्योगांसाठी वैकल्पिक गुंतवणूक निधी उभारला आहे. या निधीच्या माध्यमातून देशभरात 13 राज्ये आणि दिल्लीत 247 स्टार्टअप उद्योगांत 1 हजार 625 कोटी 73 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक केली आहे. या यादीत महाराष्ट्र 68 स्टार्टअपमधील 440 कोटी 38 लाखांच्या वैकल्पिक गुंतवणुकीस दुस-या स्थानावर आहे. तर 75 स्टार्टअप मधील 499 कोटी 85 लाखांच्या वैकल्पिक गुंतवणुकीस कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे. स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत स्टार्टअप उद्योग उभारण्यासाठी ‘फंड ऑफ फंड फॉर स्टार्टअप’ (एफएफएस) नावाने 10 हजार कोटींचा निधी उभारला आहे.