नाशिक शहरात रविवारपासून पाणीकपात

    दिनांक :28-Jun-2019
नाशिक,
नाशिक शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. या निर्णयानुसार शहरात आता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार असून इतर दिवशी दिवसातून एकदाच पाणी दिले जाणार आहे. येत्या रविवारपासून ही पाणीकपात लागू होणार आहे.
 
 
नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाण्याच्या पातळीनं तळ गाठला आहे. मागील आठवड्यातच महापौरांसह इतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. या अहवालानंतर झालेल्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आठवड्यातील एका दिवशी, गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. इतर दिवशी एकवेळ पाणी मिळणार आहे. तसंच, शहरातील जलतरण तलाव आणि वॉटर पार्कचे पाणी तोडले जाणार आहे.