सायकल वारीतल्या मुलाला ट्रकने चिरडले

    दिनांक :28-Jun-2019
नाशिक: नाशिक वरून सायकल वारीसाठी निघालेल्या  एका सायकलपटूचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायन घटना समोर आली आहे . प्रेम सचिन नाफडे असे या मुलाचे नाव आहे. रायन इंटरनॅशनल या शाळेत हा मुलगा शिकत होता. सकाळच्या सुमारास नाशिकहून सायकलवारी निघाली. सिन्नर बायपासजवळ त्यांचा टी पॉईंट होता. टी पॉईंटला सगळ्यांनी नाश्ता केला. त्यानंतर प्रेम रस्त्यावर येऊन उभा राहिला. प्रेम दुसऱ्या लेनवर उभा होता, त्याचवेळी तिथे एक बंद ट्रक उभा होता. या ट्रकचा चालक दारूच्या नशेत होता त्याने जोरात हॉर्न वाजवला. ज्यामुळे प्रेम घाबरला त्याला काय करावे ते सुचले नाही. तेवढ्यात ट्रक चालकाने गिअर टाकला. प्रेम या आवाजाला घाबरला, मात्र ट्रक चालकाने ट्रक बाजूला न घेता या मुलाच्या अंगावर घातला. या प्रकारामुळे प्रेमचा जागीच चिरडून मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघात झाल्यानंतर सायकल वारीत १८ वर्षांखालील जे मुलं मुली होते त्यापैकी ज्यांना घरी जायचे आहे त्यांना घरी पाठवण्यात आले. तर ज्यांना वारी पूर्ण करण्याची इच्छा होती त्या १८ वर्षाखालील मुलांना बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. प्रेमचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर १८ वर्षांखालील एकाही मुलाला किंवा मुलीला सायकल किंवा पायी चालू न देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. तसेच घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी नशेत असलेल्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे सायकल वारीला गालबोट लागले आहे.