धोंडी धोंडी पाणी दे म्हणत चिमुकल्यांची वरूण राजाला साद

    दिनांक :28-Jun-2019
 
रसुलाबाद: रोहणी नक्षत्राचे चवथे चरणात अवकाळी पावसाने खेळ खंडोबा चालवल्याने व हवामान खात्याने आकर्षक अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांनी काही एक विचार न करता पाऊस येणार या आशेने रोहणी नक्षत्रा पासूनच धुळ पेरणीला सुरवात केली. नंतर मृग नक्षत्र चालू झाले पण पेरणी आटोपली शेवटी आद्रा नक्षत्र लागले.तरी पावसाचा पत्ता नाही. पावसाळ्याचे दिवस असताना सर्वत्र उन्हाळा तापू लागला. शेतकऱ्यांचा शिरवा झाल्याने अनेकांचे जमिनीतील बियाणे कुजबुजून खराब झाले. तर होणाऱ्या गर्मीने मुले सुद्धा रात्रीला झोपी जाईना अनेक ठिकाणी पाण्यासाठी देवाला साकडे म्हणून धोंड्या निघू लागल्या.अशातच चार - पाच दिवसापूर्वी येथील काही महिला पुरुषांनी खांद्यावर पाण्याने भरलेले भरणे घेऊन त्यामध्ये कडूनिबांच्या डांग्या ठेऊन वाजत गाजत मारोतीच्या पारावर नेली. तेथे जाऊन भरण्यातील पाण्यानी मारुतीची आंघोळ घातली.
 
 
 
हा प्रकार तेथे उपस्थित लहान मुलांनी तसेच येथील सातभाई परिवारातील आयुष व अखिलेश या सात वर्षीय समवयस्क भावंडांचे जोडीने सुद्धा पहिला त्यांनी लगेच घरी जाऊन आई वडिलांना विचारले. तेव्हा आई वडिलांनी त्यास धोंडी म्हणतात त्यामुळे पाऊस येतो असे भाबडे पणाने सांगितले. मुले म्हणाली मग पाऊस तर आलाच नाही. त्यावर ते म्हणाले तुम्ही काढा मग पहा कसा पाऊस येतो तो! आणि मुलांनी हट्ट धरला व नेमके तेच केले बुधवारला परिसरातील सर्व बाल मित्रांना एकत्र करून कडूनिंबाचा पाला आणून तो कमरे सभोवताल बांधून धोंडीचा वेष धारण करून धोंडी धोंडी पाणी दे म्हणत वाजत गाजत येथील गाव दैवत मनंसागीर महाराजाचे मंदिरात नंतर जगदंबा त्यानंतर मारामाय व मातामाय मंदिरात जाऊन सर्वांची पाण्याने आंघोळ घातली तेवढ्यात आभाळ आले दोन - चार थेंब पाण्याचे पडते न पडते पाऊस निघून गेला. मुले म्हणाली काजी काहीही सांगता पाऊस तर आलाच नाही. मग आम्हाला झोप कशी येणार! त्यावर आई वडील म्हणाले थोडा वेळ थांबा पाऊसच येतो. आणि चमत्कारच झाला.मध्यरात्रीचे सुमारास या पावसाळ्यात कधी पडला नाही एवढा सुमारे एक तास भर धो-धो करीत पाऊस बरसला व परिसरातील सर्व नाल्यांना भर भरून पुर आला.अनेकांचे शेतातील मातीचे बंधारे फुटले तर कित्येक शेतात पाणी साचल्याच्या दुसरे दिवशी गावात सर्वत्र चर्चा होऊ लागल्या आणि सर्व शेतकरी वर्ग नव्याने दुबार पेरणीचे कामाला लागला.पण पूर्वी पेरणी केलेल्या बियाणाचे झालेले नुकसान कोण भरून देणार या भ्रमाने शेतकरी पुरता अडचणीत आला आहे.