तभा इफेक्ट- परतवाड्यात बोगस बियाणे विक्रेत्यांवर धाड

    दिनांक :28-Jun-2019
कृषी विभागाकडून बियाणे जप्त
अचलपूर: अवैधरित्या बियाणे विक्री करणार्‍या परतवाडा येथील राजू अग्रवाल व रामु अग्रवाल यांच्या मालकीच्या दुकानांवर कृषी विभागाने शुक्रवारी सांयकाळी धाडी टाकून दोनही दुकानातून मुदतबाह्य बियाणे जप्त केले. परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात बोगस बियाण्यांची विक्री या मथळ्या खाली तभाने दोन दिवसापुर्वी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.
 

 
 
विशेष म्हणजे अधिकृत परवाना नसतानाही ज्वारी व भाजीपाल्याची मुदतबाह्य बियाणे आढळून आल्याने दोनही दुकानदारांवर पोलिसि कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमुळे अवैध कृषी केंद्र संचालकांचे धाबे दणाणले आहे. गत दोन दिवसापासून मेळघाटात चांगला पाऊस झाल्याने आदिवासी बांधव कृषी केंद्रातुन दर्जेदार बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. त्याचा फायदा बोगस विक्रेत्यांनी घेतला. आता त्यांच्यावर कारवाईला सुरूवात झाल्यामुळे समाधान व्यक्त होत असून अशा दुकानांवर कारवाई सुरूच ठेवावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. सदर कार्यवाही पंचायत समितीचे कृषी अधिकारी राम देशमुख व तालुका कृषी अधिकारी प्रफुल सातव यांच्या मार्गदर्शनात झाली.