काही तर हवे उसळी घ्यायला!

    दिनांक :28-Jun-2019
नमम  
 
 श्रीनिवास वैद्य 
 
सायकलला पायडल मारणे बंद केले तरीही ती जशी काही दूर चालत राहते. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या ऊर्जेने, स्वातंत्र्यानंतर दोन-तीन लोकसभा निवडणुका जिंकणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने कधीही पक्षाच्या संघटनेकडे लक्ष दिले नाही. तशी गरजच पडली नाही. देशात विरोधी पक्ष नावालाच उरले होते. जे ठोस विरोध करू शकणार होते, त्यांना गांधीहत्येच्या खोट्या आरोपाखाली पूर्णपणे बदनाम करून टाकले होते. कॉंग्रेस पक्षाच्या नुसत्या नावावरच कुठलाही उमेदवार निवडून येत होता. मग कशाला हवे संघटन? कॉंग्रेस इज इंदिरा ॲण्ड इंदिरा इज कॉंग्रेस! स्वातंत्र्यचळवळीची ऊर्जा संपत आली तेव्हा पुढे आले गांधी घराणे. त्यांच्या नावावर सत्ता मिळते, हा भ्रम पसरविण्यात आला. खरेतर, सत्तेमुळे हाती येणारे जीवनाचे भलेबुरे करू शकणारे अधिकार, प्रचंड पैसा यांच्या चिकटपट्‌टीने नेत्यांना आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांना जखडून ठेवण्यात आले होते. याच्या भरवशावर कॉंग्रेस पक्ष निवडणुका जिंकत होता. परंतु, नाव मात्र पद्धतशीरपणे गांधी घराण्याचेच केले जात होते. लोकांनाही वाटू लागले की, गांधी घराण्यातच काही एक जादू आहे व ती जादू निवडणूक जिंकण्यास पुरेशी आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकार पराभूत झाल्यानंतर, जेव्हा सोनिया गांधींच्या नेतृत्वातील संपुआ सरकार सत्तेत आले, तेव्हा तर लोकांची गांधी घराण्याच्या या जादूवर अंधश्रद्धाच बसली. गांधी घराणे म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे देश. कॉंग्रेस हरली म्हणजे देश हरला. कॉंग्रेस जिंकली म्हणजे देश जिंकला!
 
 
 
 
कपडे धुताना, कपड्यांच्या पिळ्यांना गोट्यावर जसे आपटतात, तसे 2014 व 2019 साली जनतेने भाजपाच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाला पराभूत केले आहे. आता कॉंग्रेस उताणी पडली आहे. ना स्वातंत्र्यचळवळीची पुण्याई उरली, ना सत्तेची चुंबकीय मलाई, ना गांधी घराण्याची जादू! चिकटपट्‌टीचा गोंद उखडला आहे. लोंबत्या चिकटपट्‌टीला काही जण लोंबकळत आहेत फक्त. मग अशात कॉंग्रेस पक्षाला नवा अध्यक्ष अजूनही निवडता येत नसेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?
2019 च्या भाजपाच्या दणदणीत विजयाने विरोधी पक्ष गलितगात्र झाले आहेत, यावर मात्र राजकीय विश्लेषक आणि दरबारी पत्रकार विश्वास ठेवायला तयार नाहीत. ते सारखे, 1984 सालच्या भाजपाच्या फक्त दोन खासदारांच्या स्थितीचा दाखला देत आहेत. 1971 साली इंदिरा गांधींनी विरोधकांची दाणादाण उडविल्यानंतरही कालांतराने विरोधी पक्ष कसे शक्तिसंपन्न झालेत, याचे उदाहरण देत आहेत. तसेच कॉंग्रेससह विरोधी पक्षांचेही होईल, असा दिलासा देत आहेत. राखेतून फिनिक्स पक्षी जसा उसळी मारून आकाशात उड्‌डाण करतो, तसा कॉंग्रेस पक्षही करेल, याबाबत सर्वांचे एकमत आहे. जमिनीपासून तुटले की असेच निराधार विचार मनात स्फुरणार, यात शंका नाही. कॉंग्रेस आणि भाजपाची तुलना तरी होऊ शकते काय? कुठे भाजपा अन्‌ कुठे कॉंग्रेस? ज्या कॉंग्रेस पक्षाला संघटन म्हणजे काय हेच माहीत नाही, सत्तेचा गूळ हातात आल्यावर त्याला चिकटणारे मुंगळे हेच ज्या पक्षाचे संघटन असते, त्याची तुलना कार्यकर्त्यांचे मोहोळ असणार्‍या भाजपाशी करताना, काहीतरी विचार करायला हवा ना! अजूनही या राजकीय विश्लेषकांना व दरबारी पत्रकारांना लालूप्रसाद यादव यांचा राजद, ममता बॅनर्जींचा तृणमूल, चंद्राबाबूंचा तेलुगू देसम्‌, शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांचा भरवसा आहे की, हे पक्ष काही वर्षांतच भारतीय जनता पार्टीला टक्कर देण्याइतपत समर्थ होतील.
कुठल्याही चळवळीचा फायदा, त्या चळवळीत सहभागी झालेल्या व संघटन मजबूत असलेल्या पक्षाला सर्वाधिक मिळत असतो. महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या चळवळीचाच इतिहास बघू या. नाना पक्षांचे, इकडचे-तिकडचे अनेक लोक यात सहभागी झाले होते. सात-आठ वर्षे या आंदोलनाने राज्यात गदारोळ केला होता. इंधन संपल्यावर चळवळी थंड पडत गेली. कुणाला सर्वाधिक फायदा झाला? अर्थातच, भाजपाला. या चळवळीत सहभागी झालेले इकडचे-तिकडचे नेते आज कुठे दिसतात का? त्यांचे तर नावही कुठे ऐकू येत नाही. परंतु, या चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिरलेली भाजपा किती सामर्थ्यशाली होऊन बाहेर पडली आहे, हे लक्षात येईल. संघटन नसतानाही चळवळीचा फायदा घेण्यात यशस्वी ठरलेल्यांचे काय होते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अरिंवद केजरीवाल आणि त्यांचा आप पक्ष. आज या पक्षाची काय अवस्था झाली आहे, हे आपण बघतच आहोत. कदाचित पुढील वर्षीच्या निवडणुकीनंतर हा पक्ष दिसेनासा होतो की काय, अशी शंका येते. ममता बॅनर्जींचेही तसेच. 2021 साली बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसचा पराभव झाला की बघा, या पक्षाची कशी वाफ होते ते! काही ठिकाणी पक्षाचा पराभव होऊनही, संघटन नसतानाही काही पक्ष अजूनही टिकून राहिलेले दिसतात. याचे कारण, तिथल्या जनतेच्या डोळ्यांसमोर या पक्षांच्या विरोधात कुठला पर्यायी पक्ष नाही, हेच आहे.
कॉंग्रेस हा एखाद्दुसर्‍या पराभवाने गलितगात्र होणारा पक्ष नाही. परंतु, लागोपाठ दुसर्‍यांदा निर्णायक पराभव झाल्यामुळे, नेते आणि कार्यकर्ते यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. त्यातच जर राहुल गांधींसारखे नेतृत्व असेल तर मग काही बघायलाच नको. खरेतर, पराभवानंतर, अपयशाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यांवर घेऊन राहुल गांधी यांनी पक्षबांधणीच्या कामात स्वत:ला झोकून द्यायला हवे होते. हताश, निराश, संभ्रमित कार्यकर्त्यांशी जातीने संपर्क करून, त्यांना 2024 सालच्या निवडणुकांसाठी पुन्हा उभे करायला हवे होते. पराभवापासून हा धडा घ्यायचा नाही तर कुठला घ्यायचा? पण हे काहीएक होताना दिसत नाही. दिसणार कसे?
कधी संघटनेचा, ग्रामस्तरावरील कार्यकर्त्यांचा संघटन म्हणून विचारच केला नाही, मग ही आशा कशापायी? नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत केरळ राज्यात कॉंग्रेसने 20 पैकी 15 जागा जिंकल्या आहेत. तिकडे पंजाबात 13 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत लोकसभेतील पक्षाचा गटनेता म्हणून कॉंग्रेसने कुणाला निवडावे? ज्या बंगालमधून पक्षाला फक्त एक जागा जिंकता आली, तिथल्या अधीररंजन चौधरी यांना कॉंग्रेसने निवडले. केरळमधून का नाही निवड केली? पंजाबचाही एखादा खासदार या जागेवर नेमता आला असता. ही कुठली मुत्सद्देगिरी म्हणायची! या अशा धक्कादायक निवडीमुळे इतर नेत्यांच्या मनावर निश्चितच परिणाम होत असतो. तिकडे भाजपाचे बघा! लोकसभेच्या सभापतिपदी राजस्थानचा खासदार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्यासाठी ओडिशातील खासदाराला मान दिला. या प्रस्तावाला अनुमोदन देण्यासाठी महाराष्ट्रातील आदिवासी तरुण महिला हिना गावीत हिला संधी. दुसर्‍या फळीतील एकेका नेत्याला जाणीवपूर्वक समोर आणले जात आहे. त्यातही तरुणांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. पक्षनेतृत्वाने केवळ पुढची निवडणूक बघायची नसते. त्याही पलीकडे जाऊन आपल्या पक्षाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने बघायची असतात. एवढा दणदणीत विजय मिळाल्यानंतरही, भाजपाचे संघटन स्वस्थ बसले नाही. सर्वात लोकप्रिय व यशस्वी मुख्यमंत्री शिवराजिंसह चौहान यांना पक्ष सदस्य अभियानाचे अखिल भारतीय संयोजक पद देण्यात आले आणि चौहान यांनी लगेच देशभर दौरे करून, प्रत्येक राज्यात पक्ष सदस्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. इथे दम घ्यायलाही उसंत नाही आणि तिकडे कॉंग्रेसमध्ये, गांगरलेल्या राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष पद न स्वीकारण्याचा निर्णय मागे घ्यावा म्हणून, गटागटाने विनवण्या सुरू आहेत. देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून मान मिरविणारा व आजही नाही म्हणायला, देशातील सर्व प्रांतांत पाळेमुळे असणारा, तसेच लोकसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस पक्ष, निवडणूक होऊन एक महिना झाला तरी आपला अध्यक्ष कोण, हे ठरवू शकला नाही. या पक्षाच्या शीर्षस्थानीच पोकळी निर्माण झाली आहे. असा हा कॉंगे्रस पक्ष व इतर विरोधी पक्ष खरेच पुन्हा उभारी घेतील?
9881717838