तिसर्‍या दिवशीही तारसाच्या शाळेची घंटा शांतच!

    दिनांक :28-Jun-2019
शिक्षकाच्या मागणीवर पालक ठाम
गोंडपिपरी: नियमित शिक्षक देण्याच्या मागणीला घेऊन पालकांनी केलेल्या शाळाबंद आंदोलनामुळे शाळेच्या तिसर्‍या दिवशीही तालुक्यातील तारसा (बु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची घंटा वाजलीच नाही. पालकांच्या या आंदोलनाने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. असे असले, तरी विद्यार्थ्यांना गुरुजी कधी येणार आणि शाळा कधीपासून भरणार, याची प्रतिक्षा आहे.
 

 
 
केंद्र प्रमुख महल्ले यांच्यासह एकमेव शिक्षक देवाडकर यांच्याकडून आता तारसा गावातील पालकांच्या गृहभेटीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी मनधरणी केली जात आहे. दरम्यान, मागील सत्र वाया गेले, आता यावर्षी तरी आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक द्या, या मागणीला घेऊन पालक आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याच्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत.
तारसा शाळेतील शिक्षक गावळे डिसेंबर 2018 पासून सतत अनधिकृत गैरहजर असताना त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही? असा सवाल गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या शिक्षकांच्या अनधिकृत गैरहजेरीला शिक्षण विभागच पाठीशी घालत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्या शिक्षकाच्या अशा वागण्यामुळे गेल्यावर्षी विद्यार्थ्यांचे फार मोठे शालेय नुकसान झाले. याबाबतच्या तक्रारी वारंवार केंद्रप्रमुख महल्ले यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. मात्र, केंद्रप्रमुखांनी या गंभीर बाबीकडे कानाडोळा करीत त्या शिक्षकाला नेहमी पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षभरात त्या शिक्षकावर कसलीच कारवाई केली नाही, असा आरोपही पालकांनी केला आहे. अशातच नवीन शैक्षणिक वर्षातील 28 जूनला शाळेचा तिसरा दिवस उजाडला. तरीदेखील हे शिक्षक शाळेत आलेच नाही.
शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी केलेल्या आंदोलनानंतर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे यांनी दिलेले आश्वासन ते पाळतात का, याकडे आता सर्व पालकांचे लक्ष लागले आहे. अखेर जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळणार नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही, या निर्णयावर पालक अजूनही ठाम असून, येत्या सोमवारपर्यंत शिक्षकाची वाट बघून शिक्षक न मिळाल्यास मंगळवार, 2 जुलैपासून विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेशच काढण्याचा निर्धार पालकांनी व्यक्त केला आहे.