वीज अंगावर पडुन दोघांचा मृत्यू

    दिनांक :28-Jun-2019
बाळापूर: शेतात पेरणी करत असताना वीज अंगावर पडल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.ही घटना तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवार, २८ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. कपिल दिपक शेगोकार (१६) व बाळू नारायण उमाळे (५५) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवारी एका शेतात पेरणी सुरु असताना दुपारच्या वेळी विजांच्या कडकडाटासह अचानक ढग दाटून आले. यावेळी शेतात पेरणी करीत असलेल्या कपील शेगोकार व बाळू उमाळे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते दोघेही गंभीररित्या भाजल्या गेले. दोघांनाही तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.