पावसामुळे पश्चिम-मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    दिनांक :28-Jun-2019
मुंबई : मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. पहिल्या वहिल्या पावसानेच मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेची दैना झाल्याचे पाहायला मिळत आहे.   चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडवर पोलीस स्थानकाच्या बाजूला रस्त्यावर पाणीच पाणी साचलेले  आहे. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.  याशिवाय पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरसुद्धा पावसाचा परिणाम झाला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा धावत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात पाणी भरायला सुरूवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली. पावसाचा फटका बसला.. कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली आहे. आसनगाव ते खर्डी स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक ३० मिनिटे उशिराने सुरू आहे. तर धीम्या मार्गावरील वाहतूक २० मिनिट उशिराने सुरू आहे. मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा फटका हा तिन्ही मार्गावरील लोकलसेवेला देखील बसला आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पंधरा मिनिटे उशिराने सुरू आहे.