इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पंत इन; शंकर आऊट?

    दिनांक :29-Jun-2019
बर्मिंघम,
भारत-इग्लंड या दोन बलाढ्य संघांमध्ये रविवारी होणाऱ्या 'हाय व्होल्टेज' सामन्याकडे अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. इंग्लंडसाठी ही लढत अतिशय महत्वाची आहे. पण भारतालाही विजयी वाटचाल कायम ठेवायची आहे. गेल्या तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या विजय शंकरला संघाबाहेर ठेवून स्फोटक फलंदाज रिषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या लढतीत संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

 
यजमान इंग्लंडसाठी स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताविरुद्ध विजय आवश्यक आहे. पण भारताचेही ११ गुण आहेत. इंग्लंडला पराभूत करून 'विराट' टीमला उपांत्य फेरी गाठायची आहे. जायबंदी झालेला सलामीवीर शिखर धवन आणि गोलंदाज भुवनेश्वर कुमार संघाबाहेर आहे. सध्या तरी संघाच्या कामगिरीवर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. पण मधल्या फळीतील खेळाडूंची कामगिरी बघता इंग्लंडविरुद्धच्या लढतीत संघात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अंतिम अकरामध्ये कुणाला खेळवणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे.