45 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात 62 कोटीचे अनुदान

    दिनांक :29-Jun-2019
जिल्ह्यातील तूर, हरभरा शेतकर्‍यांना दिलासा
कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडे यांची माहिती
 
अमरावती: तूर आणि हरभरा अनुदानाचा लाभ अमरावती जिल्ह्यातील 45 हजार 124 शेतकर्‍यांना मिळाला आहे. त्यांच्या खात्यात 62 कोटी 61 लक्ष रूपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. तथापि, अद्यापही तांत्रिक अडचणीमुळे अनुदान जमा न झालेल्या शेतकरी बांधवांनी तात्काळ तालुका खरेदी केंद्रांवर संपर्क साधण्याचे आवाहन कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
 
 
अनुदानाची रक्कम काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे जमा होऊ शकलेली नाही. अशा शेतकर्‍यांना राज्य शासनामार्फत तालुका खरेदी केंद्रावरून अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी त्यांचे आधारलिंक बँक खाते आणि आधारकार्डाची सत्यप्रत खरेदी केंद्रावर जमा करावयाची आहे. आतापर्यंत 45 हजार 124 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सुमारे 62 कोटी 61 लक्ष रूपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. अनुदानासाठी अमरावती जिल्ह्यात 48 हजार 736 पात्र लाभार्थी आहेत. त्यापैकी तुरीच्या अनुदानाचे 30 हजार 529 लाभार्थ्यांपैकी 28 हजार 456 शेतकर्‍यांना 39 कोटी 27 लक्ष रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणीमुळे 2 हजार 73 शेतकर्‍यांच्या खात्यात 2 कोटी 86 लक्ष रूपयांचे अनुदान जमा होऊ शकले नाही.
हरभरा अनुदानासाठी जिल्ह्यात 18 हजार 208 पात्र शेतकरी आहेत. त्यापैकी 16 हजार 668 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 23 कोटी 34 लक्ष रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे 1 हजार 540 शेतकर्‍यांच्या खात्यात 2 कोटी 13 लक्ष रूपयांची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरही काही शेतकरी बांधवांची तूर आणि हरभरा खरेदी होऊ शकली नाही. अशा पात्र शेतकर्‍यांनी तालुक्याच्या खरेदी केंद्रावर जाऊन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्र्यांनी यांनी केले आहे.