कोंढवा दुर्घटनेची सखोल चौकशी करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

    दिनांक :29-Jun-2019
पुणे,
पुण्यातील कोंढवा या ठिकाणी भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेबद्दल आपल्याला अतीव दुःख झाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे. या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम पडू दे असे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आले आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून आणखी काही लोकही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. मृतांमध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचा आणि एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. 
या प्रकरणी दोषी बिल्डर आणि कंत्राटदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली आहे. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. भेटीनंतर त्यांनीही दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. आता मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.