अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध संपण्याचे संकेत; ट्रम्प-जिनपिंग भेट

    दिनांक :29-Jun-2019
ओसाका,
जगातील दोन मोठया अर्थव्यवस्था चीन आणि अमेरिकेमध्ये सुरु असलेले व्यापार युद्ध निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी चीनच्या निर्यातीवर नवीन कर लादणार नाही अशी घोषणा केली आहे. जापान ओसाकामध्ये जी-२० परिषद सुरु आहे. तिथे डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्य शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली.

 
व्यापारी संकटातून मार्ग काढण्यासाठी चीन बरोबर ऐतिहासिक व्यापार करार करण्यासाठी आपण तयार आहोत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे दोन्ही देशातील कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सचे नुकसान सोसावे लागत आहे.
 
मागे आम्ही करार करण्याच्या जवळ असताना काही तरी घडले आणि चर्चा फिस्कटली. आता आम्ही कराराच्या आणखी जवळ आलो आहोत. दोन्ही देशांमध्ये निष्पक्ष व्यापारी करार झाला तर ते ऐतिहासिक असेल. आर्थिक सुधारणांसंबंधी होणाऱ्या बैठकीतून काही प्रगती झाली नाही तर चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर लावण्यात आलेला कर वाढवण्याची धमकी सुद्धा ट्रम्प यांनी दिली.
 
मागच्या ४० वर्षात अमेरिका-चीन संबंध आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती मोठया प्रमाणात बदलली आहे. पण एक गोष्ट बदललेली नाही. चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांना परस्पर सहकार्याचा फायदा झाला आहे आणि वादामध्ये नुकसान सहन करावे लागले आहे असे शी जिनपिंग यांनी सांगितले. विसंवाद आणि संघर्षापेक्षा सहकार्य, चर्चा केव्हाही चांगली असे जिनपिंग म्हणाले.